Dindorichi Ladhai Mahiti 1670 | दिंडोरीची लढाई माहिती
छत्रपती शिवाजी महाराज( shivaji maharaj mahiti marathi ) यांनी ऑक्टोबर 1670 मध्ये पुन्हा एकदा सूरत लुटली (suratchi lut). आणि पुन्हा एकदा महाराजांनी मुघलांचे नाक कापले ! सुरतेतील संपत्ती घेऊन महाराज परत येत असतांनाच वाटेत दिंडोरी येथे मुघल फौजेने महाराजांना गाठले. आजच्या या लेखात आपण दिंडोरीच्या लढाईची माहिती (Dindorichi Ladhai Mahiti 1670) जाणून घेऊ या.
छत्रपती शिवाजी महाराज यांची सुरतेवरील दूसरा हल्ला : suratchi lut
पुरंदरचा तह मोडल्यानंतर महाराजांनी मुघलांवर हल्ले करायला सुरुवात केली. भराभर एकेक प्रांत , किल्ले घेण्यास महाराजांनी प्रारंभ केला. महाराजांनी पुन्हा एकदा सुरतवर हल्ला करुन सूरत लुटायचे ठरविले. त्याआधी जानेवारी 1664 महाराजांनी सूरतवर हल्ला करून सूरतमधून प्रचंड संपत्ती प्राप्त केली होती. त्यानंतर खुप वेळा सुरतवर महाराज हल्ला करणार अशा अफवा उठत होत्या. आता मात्र खरोखरच महाराजांनी सुरतवर हल्ला केला.
2 ऑक्टोबर 1670 ला महाराजांनी पंधरा हजार फौजेसह सुरतवर हल्ला केला. सुरतेच्या पहिल्या हल्ल्याचीच पुनरावृत्ती होत होती. मोठ मोठे वाडे , दुकाने , कोठारें यामधून होन , मोहरा , मोती ,सोने – चांदी , जड – जवाहिरे असा जिन्नस जमा होऊ लागला. फ्रेंच , डच, आणि थोड्याफार प्रतिकारानंतर इंग्रजांनीही महाराजांना नजराने दिले. भली मोठी संपत्ती महाराजांना या हल्ल्यात मिळाली.
Dindorichi Ladhai Mahiti 1670 | दिंडोरीची लढाई माहिती
अगणित संपत्ती घेऊन महाराजानी सूरत सोडली. महाराजांनी सूरतवर हल्ला केल्याचे शहजादा मुअज्जमला समजले. त्याने दाऊदखान कुरैशी याला महाराजांवर हल्ला करण्याचा हुकुम दिला. दाऊदखान कुरैशी त्यावेळी बुरहानपुर येथे होता. तो त्वरेने फौज घेऊन महाराजांच्या पाठलागावर निघाला. महाराज तोपर्यंत बागलाणपर्यंत आले होते. आपल्या पाठलागावर दाऊदखान कुरैशी फौजेसह येत आहे ही खबर महाराजांना मिळाली. महाराजांनी मग वणी – दिंडोरीच्या मार्गाने पुढे जाण्याचे ठरविले.
महाराजांच्या फौजेची हालचाल दाऊदखानास मिळाली. त्यानुसार दाऊदखान लगेच चांदवडकडे निघाला. महाराजांना चांदवडचा डोंगर ओलांडूनच दक्षिणेकडे जावे लागणार होते. त्यामुळे दाऊदखान चांदवडास रात्रीच्या सुमारास येऊन पोहोचला.
जवळपास मध्यरात्रीच्या सुमारास दाऊदखानास खबर मिळाली की , महाराज कंचन – मंचनचा घाटामार्गे गुल्शनाबाद म्हणजे नाशिकच्या रस्त्याने जात आहेत. कंचन – मंचनच्या घाटापासुन चांदवड सुमारे पाच कोस लांब होते. दाऊदखानाने लगेच आपल्या फौजेला कूच करण्याचा आदेश दिला. त्याने इख्लासखानास त्वरेने पुढे पाठविले.
पहाटेच्या सुमारास इख्लासखान महाराजांच्या फौजेनजिक पोहोचला. तेथे पोहोचताच त्याला महाराजांची फौज लढाईच्या तयारीत उभी असल्याचे दिसले. महाराजांना अगोदरच हेरांद्वारे ही खबर मिळाली होती. त्यांनी सुरतेची लुट आणि इतर सामान पाच हजार पायदळासोबत पुढे पाठवून दिले. स्वत: दहा हजार फौज घेऊन लढाईस सज्ज राहिले.
महाराज स्वत: अंगात बख्तर घुगी घालून दोन्ही हातात पट्टे चढवुन युध्दास सज्ज झाले. महाराजांच्या निसबतिस सरनौबत प्रतापराव गुजर , व्यंकोजीपंत , आनंदराव असे मातब्बर सरदार होते.
इख्लासखान हा तडफदार सरदार होता. त्याने त्वेषाने मराठ्यांवर हल्ला चढविला. घनघोर लढाईस सुरुवात झाली. हातघाईची लढाई सुरु झाली. मुघल आणि मराठे दोन्हीकडून शौर्याची कमाल होत होती. मुघल सरदार हत्तीवरून मराठ्यांवर बाण चालवित होते. महाराजांच्या फौजेत हत्ती तसेच तोफा कधीच नसत. गनिमी काव्याच्या युद्धात असे जड प्राणी आणि वस्तु कामाच्या नसतात. मराठ्यन्नी मुघलांचा एक हत्ती काबीज करून महाराजांच्या समोर आणला.
आता मराठे मुघलांवर भारी पडू लागले. मुघलांना मराठ्यांचा वार झेलणे कठिन होऊ लागले. एवढ्यात मराठ्यांकडील कोणाचा तरी जबरदस्त वार इख्लासखानावर पडला. आणि इख्लासखान घोड्यावरून कोसळला. संग्रामखान घोरी नावाचा सरदारही जखमी होऊन पडला. तेवढ्यातच दाऊदखान युद्धक्षेत्रावर पोहोचला. त्याने लगेच राय मकरंद या सरदारास मराठ्यांवर हल्ला करण्यास सांगितले आणि जखमी इख्लासखानास बाहेर काढले. दाऊदखानाने आपली निशाणे , नौबती , हत्ती आणि राखीव फौज बाजूच्याच पडीक खेड्यात पाठविल्या.
दाऊदखान स्वत: जातिवंत शूर शिपाईगडी होता. त्याने पुन्हा मराठ्यांवर निकरीचा हल्ला चढविला. त्यानंतर सुमारे दोन प्रहर भयंकर हातघाईची लढाई झाली. मुघल तोफखान्याचा दरोगा मीर अब्दुल मबुद आणि मुघल फौज यांचा संपर्क तुटला. मराठ्यांनी त्याच्यावर हल्ला करुन त्याला व त्याच्या मुलास ठार केले. तोफखान्याचे निशान आणि घोडे मराठ्यांनी काबीज केले.
17 ऑक्टोबर 1670 ला झालेले हे युद्ध संपूर्ण दिवसभर चालले. मराठ्यांपुढे मुघलांचा टिकाव लागला. शेवटी दाऊदखानास माघार घ्यावी लागली. या युद्धात जवळपास तीन हजार मुघल ठार झाले.
महाराजांचा आणखी एक प्रचंड विजय झाला. लुट आणि युद्धात जिंकलेले मुघलांचे हत्ती , घोडे घेऊन महाराज स्वराज्यातील कुंजरगडावर गेले. तेथून पुढे रायगडावर गेले.
सुरतेवर पुन्हा हल्ला चढवुन महाराजांनी प्रचंड संपत्ती मिळविली आणि दिंडोरीच्या युद्धात मुघलांचा प्रचंड पराभव केला.
तुम्हाला आमचा Dindorichi Ladhai Mahiti 1670 हा लेख कसा वाटला ते जरुर कळवा.
तुम्हाला जर रामसेजच्या लढाई बाबत माहिती घ्यायची असेल तर तुम्ही पुढील लिंकवरून माहिती घेऊ शकता.
Ramsej Fort Information In Marathi 2021 | हा किल्ला जिंकायला मुघलांना तब्बल 5 वर्षे लागली
तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाइटला पण भेट देऊ शकता.
संदर्भ : राजा शिवछत्रपती लेखक – श्री. ब. मो. पुरंदरे