Shivaji Maharaj Rajyabhishek 1674 | छ.शिवाजी महाराज राज्याभिषेक महत्त्व

  1. Shivaji Maharaj Rajyabhishek 1674| छ.शिवाजी महाराज राज्याभिषेक महत्त्व

Shivaji Maharaj Rajyabhishek

भारताच्या मध्ययुगीन इतिहासात छ. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा ही एक युगप्रवर्तक घटनाआहे. गेल्या तीन – चार शतकांपासुन अखंड भारत यावनी सत्तेखाली अंकित होता. अशा या प्रतिकूल परिस्थितीत छ. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आदिलशाहीला पायबंद घालून उत्तरेतील मुघलांची लाट त्यांनी आपल्या तलवारीवर थोपुन धरली आणि महाराष्ट्रातील काही भूभाग स्वतंत्र केला. महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापून मराठी राजा छत्रपती बनला. त्यामूळेच शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या या लेखात आपण Shivaji Maharaj Rajyabhishek म्हणजेच  छ.शिवाजी महाराज राज्याभिषेक महत्त्व याविषयी माहिती घेऊ या.

 छ.शिवाजी महाराज आणि गागाभट्ट यांची भेट :

वाराणसीला राहणारे गागाभट्ट त्या काळातील थोर पंडित होते. तसे गागाभट्ट हे मूळचे पैठणचे  होते. गागाभट्ट हे स्वताहुनच महाराजांच्या पराक्रमाच्या वार्ता ऐकून महाराजांच्या दर्शनाला आले. याबाबतची माहिती खुद्द सभासदकार देतात. कृष्णाजी अनंत सभासद हे बखरकार म्हणतात,” पुढे वेदमूर्ति गागाभट्ट म्हणून वाराणसीहुन राजांची कीर्ति ऐकून दर्शनास आले. भटगोसावी थोर पंडित , चार वेद सहा शास्त्रे योग्याभ्यास संपन्न, ज्योतिषी,मांत्रिक,सर्व विद्येने निपुण, कलियुगीचा ब्रम्हदेव असा पंडित. त्यांस राजे व सरकारहुन सामोरे जाऊन, भेट घेऊन, सन्मानें आणिले.”

कृष्णाजी अनंत सभासद पुढे सांगतात की,” गागाभट्ट बहुत संतुष्ट झाले. भट गोसावी यांचे मते मुसलमान पातशाहा तक्ती बसून , छत्र धरून,पातशाही करितात. आणि शिवाजीराजे यांनी चार पातशाहीं दबावल्या आणि पाऊण लाख घोडा लष्कर गडकोट असें असतां त्यांस तक्त नाहीं. यांकरिता मराठा राजा छत्रपती व्हावा असें चित्तांत आणिले. आणि राजियाती मानिले. अवघे मातब्बर लोक बोलावून आणून, विचार करितां सर्वांचे मनास आले. तेव्हां भट गोसावी म्हणू लागले कीं,तक्ती बसावे.

See also  शिवाजी महाराजांचा शाईस्तेखानावरील हल्ला Full माहिती 2021 | Shaista Khan And Shivaji Maharaj

भोसले कुल – सिसौदिया घराण्याची शाखा :

छत्रपती शिवाजी महाराज राजपूत कुलातील होते याबाबत काहीच शंका नाही. शहाजी राजे भोसले स्वत: राजपूत असल्याचे अभिमानाने लिहित असत. छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ति ऐकून उत्तर भारतातून आलेला कवी भूषण आपल्या ‘शिवराजभूषण’ या काव्यात लिहितो –

“महा बीर ता बंस में भयो एक अवनीस |

बिरद ” सिसौदिया ” दियो ईस को सीस||५||

ताते सरजा बिरद भो सोमित सिंह प्रमान |

रत्न भूसिलासु ” भोसिला” आयुष्यमान खुमान ||८||

साहस अपार हिदुवान को अधीर धीर |

सकल “सिसौदिया” सपूल कुल को दिया ||

लोग कहै इमि बच्छिन जेय सिसौदिया रावरे हल ठये है ||३१५ ||”

कवी भूषण हा उत्तर भारतातील असल्याने त्याला सिसौदिया वंशाची माहिती असल्यानेच त्याने भोसले कुल हे सिसौदिया घराण्याशी संबधित असल्याचे म्हटले आहे. या शिवाय कवी जयराम देखील आपल्या ” राधामाधवविलासचम्पू ” या ग्रंथात शहाजी राजांचा संबंध सिसौदिया वंशाशी जोडतो.

Shivaji Maharaj Rajyabhishek

 

शिवराज्यभिषेक : Shivaji Maharaj Rajyabhishek

रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याची लगबग सुरु झाली.महाराजांसाठी ३२ मण सोन्याचे सिंहासन तयार झाले. गागाभट्ट यांनी प्रत्यक्ष  छ. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यापूर्वी ‘ राज्यभिषेकप्रयोग ‘ आणि ‘तुलापुरुषदानविधी ‘ हे दोन ग्रंथ तयार केले. राज्याभिषेक ही धार्मिक बाब असल्याने त्यांनी राज्यभिषेकासाठी आवश्यक बाबींची पूर्वतयारी केली. त्यामध्ये शिवरायांची मुंज करण्यात आली, तसेच  सुवर्णतुला करण्यात आली.सुवर्णतुला दानाच्या वेळी महाराजांचे वजन १६० पौंड होते. त्यानंतर महाराजांचा सोयराबाई आणि इतर दोन पत्नीसोबत समंत्रक विवाह करण्यात आला. शिवराज्यभिषेक सोहळा एकूण नऊ दिवस चालला.

राज्याभिषेक विधी मध्ये  गागाभट्ट यांनी विविध विधी महाराजांकडून करवून घेतले. महाराजांनी यावेळी पुष्कळ दानधर्म केला. शनिवार दि.६ जून १६७४ ला म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९५ ला सकाळच्या प्रहरी महाराज सिंहासनावर विराजमान झाले. राजे छत्रपती झाले. थोर दिवस. एक युगप्रवर्तक घटना. कित्येक शतकांनी एका हिंदू राजाने राज्य स्थापन करुन राज्याभिषेक केला, सार्वभौम राजा बनला. महाराज शककर्ते बनले. रायगड स्वराज्याची राजधानी बनली. ‘ राज्याभिषेक शक ‘ ही नवीन कालगणना सुरु केली. शिवराई आणि होन हे दोन चलन सुरु केले. फार्शी भाषेऐवजी मराठी भाषेला प्राधान्य दिले. राज्यव्यवहारकोष हा ग्रंथ तयार करुन घेतला.

See also  स्वराज्यजननी जिजामाता माहिती | Swarajy Janani Jijamata 2022

छ. शिवाजी महाराज यांचा तांत्रिक राज्याभिषेक : Shivaji Maharaj Rajyabhishek

छ. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाल्यावर काही दिवसांनीच राजमाता जिजाऊ यांचा मृत्यु झाला ( १७ जून १६७४ ). तसेच रायगडावर असलेल्या घोड्यांच्या पागेवर वीज कोसळली आणि काही घोडी त्यात मरण पावली. ह्या सर्व गोष्टी झाल्याने राज्याभिषेक विधित काही त्रुटी राहिली असल्याचे निश्चलपूरी यांनी सांगितले. निश्चलपूरी यांनी महाराजांना तांत्रिक पध्दतीने पुन्हा राज्याभिषेक करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार महाराजांनी २४ सप्टेंबर १६७४ ला निश्चलपूरी यांच्या हातून तांत्रिक पध्दतीने पुन्हा राज्याभिषेक करवून घेतला.

छ. शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाचे महत्त्व :

छ. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ही भारताच्या इतिहासातील एक क्रांतिकारक घटना आहे. अखंड भारत हा यावनी सत्तेखाली असताना त्यानी सार्वभौम असे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हो काही सोपी आणि साधी गोष्ट नाही.

शिवरायांनी राज्याभिषेक करुन धार्मिकदृष्टया आणि राजकीयदृष्टया नैतिक अधिष्ठान प्राप्त केले. शिवराय रीतसर सिहासनाधिश्वर बनले. इंग्रज,डच, पोर्तुगीज असे विदेशी शत्रू  महाराजांना आदराने  नजराने सादर करू लागले.

न्यायचे आणि धर्माने चालणारे राज्य स्थापन झाल्याने प्रजाही खुश झाली आणि शत्रुंवर महाराजांचा अधिक वचक निर्माण झाला.

असा चारित्र्यसंपन्न युगप्रवर्तक राजा इतिहासात झाला नाही आणि होणार पण नाही. जय शिवराय.

तुम्हाला आमचा लेख कसा वाटला ते जरुर कळवा.

तुम्हाला जर छ. संभाजी महाराज यांच्याविषयी वाचायचे असेल तर तुम्ही पुढील लिंक द्वारे वाचू शकता.

Sambhaji Maharaj history in marathi language 2021 | छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल माहिती

तुम्ही http://www.marathimahiti.com या website ला ही भेट देऊ शकता.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Spread the love

3 thoughts on “Shivaji Maharaj Rajyabhishek 1674 | छ.शिवाजी महाराज राज्याभिषेक महत्त्व”

Leave a Comment