Table of Contents
महाप्रतापी दिग्विजयी सम्राट समुद्रगुप्त | Samudragupta History In Marathi
मौर्य साम्राज्याच्या नंतर खऱ्या अर्थाने एकसंध आणि बलशाली साम्राज्य जर कोणते असेल तर ते गुप्त साम्राज्य होय. इ. स. च्या चौथ्या शतकात स्थापन झालेले गुप्त साम्राज्य म्हणजे भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. श्री गुप्त (शासन काल इ. स.240 ते 280) हा गुप्त साम्राज्याचा मूळ संस्थापक मानला जातो.
गुप्त राजघराण्यात अनेक पराक्रमी राजे होऊन गेले पण या सर्वांमध्ये आपल्या पराक्रमाने वेगळी छाप पाडणारा महाप्रतापी दिग्विजयी सम्राट समुद्रगुप्त होय. आजच्या या लेखात आपण या दिग्विजयी सम्राट समुद्रगुप्ताची म्हणजेच Samudragupta History In Marathi माहिती बघू या.
समुद्रगुप्ताबाबत आपल्याला जी माहिती मिळते ती मौर्य सम्राट अशोकाच्या अलाहाबादच्या स्तंभाच्या दुसऱ्या बाजूला सम्राट समुद्रगुप्ताने केलेल्या साम्राज्य विस्ताराच्या प्रशस्तीपर वर्णनावरून मिळते. या स्तंभलेखात समुद्र्गुप्ताचा उल्लेख लिच्छवीदौहित्र असा केलेला आहे. सम्राट समुद्रगुप्ताच्या दरबारातील हरीसेन या विद्वान कवीने समुद्रगुप्ताचे बालपण, चंद्रगुप्त पहिला याने त्याची वारस म्हणून केलेली नियुक्ती, सत्तेसाठी झालेली यादवी, समुद्रगुप्ता चे पराक्रम इत्यादींचे वर्णन ‘ प्रशस्ती ‘ या काव्यात करून ते या स्तंभावर कोरले आहे.
महाराजाधिराज शककर्ता चंद्रगुप्त पहिला आणि लीच्छवी राजघराण्यातील राजकुमारी कुमारदेवी यांचा समुद्रगुप्त हा पुत्र होय. समुद्रगुप्त हा चंद्रगुप्तचा ज्येष्ठ पुत्र नव्हता परंतु त्याच्या पराक्रम आणि कर्तबगारीने प्रभावित होऊन चंद्रगुप्ताने त्याला वारस म्हणून नियुक्त केले.
समुद्रगुप्ताचे विजय | Samudragupta History In Marathi
महाराजाधिराज चंद्रगुप्ताने अयोध्या,प्रयाग व दक्षिण बिहारातील मगध या प्रांतावर नियंत्रण प्रस्थापित केले होते. इ. स. 235 मध्ये त्याचा मृत्यू झाला त्यावेळी त्याच्या वर्चस्वाखाली मगध,प्रयाग,साकेत आणि वैशाली हे प्रांत होते.
प्रारंभीचे विजय :
राज्याभिषेक सोहळा झाल्यावर लगेच समुद्रगुप्ता ने साम्राज्य विस्ताराचे धोरण स्वीकारले . मथुरा व पद्मावतीचे नागवंशी राजे गुप्त साम्राज्याचे शत्रू होते. वेगवान हालचाली व पराक्रम यांच्या जोरावर त्याने या दोन्ही राजांचा पराभव केला. पाटलीपुत्र ही मगधची वैभवशाली राजधानी त्याच्या ताब्यात आली.
उत्तरेकडील काही महत्त्वाचे विजय :
गुप्त साम्राज्याचे उत्तरेकडील शत्रूंचा पराभव करून त्याने उत्तर भारत, मध्य भारत आणि बंगालचा काही भाग जिंकून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला.प्रयाग प्रशस्तिद्वारे आपणास अशी माहिती मिळते की समुद्र्गुप्ताने उत्तर भारतातील नऊ राज्यांना जिंकुन आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले.यामध्ये मतिल राज्य, पुष्करणचे राज्य कोटवंशीय राज्य इ. राज्य होते.
पूर्व सीमेवरील वन्य राजांवर विजय :
गुप्त साम्राज्याच्या पूर्व सीमेवरील वन्य जमातींची राज्ये स्वतंत्र होती. त्यांच्या आक्रमणाचा सतत धोका संभवत होता. त्यावेळी समुद्रगुप्ताने पूर्व बंगालमधील दावक, आसाम,गढवाल प्रांतातील कर्मापुर व ब्रम्हपुत्रा नदीच्या मुखाजवळील समतर तसेच नेपाळमधील पाच वन्य राजांना आपल्या वर्चस्वाखाली आणले.
सीमेवरील गणराज्यांवर विजय :
गुप्त साम्राज्याच्या पश्चिमी सीमेवर काही सामर्थ्यशाली गणराज्ये होती.यामध्ये मारवडमधील मल्लव,राजपुतानामधील अमिर, रावी व चिनाब या नद्यांच्या दुआबातील मुद्रकाचे गणराज्य याशिवाय यौधेय, सकानिक, नागार्जुन, खरपारिक, प्रार्जुन इत्यादी गणराज्ये समुद्रगुप्ताने जिंकून घेतले. अशाप्रकारे समुद्रगुप्ताने पूर्व, उत्तर व पश्चिम दिशेला आपला साम्राज्य विस्तार केला. यानंतर त्याने आपले लक्ष दक्षिणेकडे वळविले.
दक्षिण दिग्विजय :
दक्षिण दिग्विजय करतांना समुद्रगुप्ताने उत्कृष्ट मुत्सद्दीपणा दाखविला. त्यावेळेस वाकाटकांचे प्रबळ सामर्थ्यशाली राज्य दक्षिणेत होते. त्यांच्याशी युद्ध न करता 12 प्रमुख राज्ये जिंकली परंतु त्यांना आपल्या साम्राज्यात समाविष्ट न करता केवळ खंडणी ठरवून मांडलिक बनविले समुद्रगुप्ताने जिंकून घेतलेली बारा राज्ये –
1. रामपुर, संभलपुर हे जिल्हे असलेले महेंद्र याचे कोसल राज्य.
2. गोंडवानातील व्याघ्रराजांचे महकांतर
3. मध्य प्रदेशमधील जौनपुरचा भाग असलेले मंतराजाचे कोसल.
4. आंध्रातील गोदावरीजवळील महेंद्रगिरीचे पिष्टपुर.
5. विशाखापट्टणमजवळील स्वामीदत्ताचे कोट्टर.
6. एरंडपल्लीचे राज्य.
7. कांजीवरम परिसरातील विष्णुगोपांचे कांची राज्य.
8. एल्लोर परिसरातील हस्तीवर्मनचे वेंगी राज्य.
9. नेल्लोर परिसरातील उग्रसेनाचे पल्लक राज्य.
10. कुबेराचे देवराष्ट्र.
11. अर्काट परिसरातील धनंजयाचे कुष्टलपुर.
12. नीलराजाचे अवमुक्त राज्य.
अश्वमेध यज्ञ :
समुद्रगुप्ताने सर्व दिशांनी साम्राज्य विस्तार केल्यावर दैदिप्यमान असा अश्वमेध यज्ञ केला. त्यावेळेस त्याने सोन्याची नाणी पाडली. त्यांवर ‘अश्वमेध पराक्रम ‘ अशी अक्षरे कोरली आहेत. या यज्ञामूळे बऱ्याच कालावधीनंतर अश्वमेध यज्ञ करणारा ( चिरोत्सला अश्वमेधहर्ता ) असा त्याचा उल्लेख शिलालेखात आहे. मत्सपुराणात चंद्र गोत्रामधील चंदमस राजाच्या प्रमति या पुत्राच्या दिग्विजयाचे वर्णन केलेले आहे. बहुदा ते वर्णन समुद्रगुप्ताचेच असावे.
समुद्रगुप्ताच्या कामगिरीचे मूल्यमापन | Samudragupta History In Marathi
पराक्रमी व मुत्सद्दी सम्राट :
समुद्रगुप्ताने जवळपास चाळीस वर्षे शासन केले. त्याने आपल्या पराक्रमाने व मुत्सद्दीपणामूळे जवळ जवळ संपूर्ण भारत आपल्या वर्चस्वाखाली आणला. शक, कुशाण, वाखाटक आणि सिंहली राजांसोबत त्याचे सलोख्याचे संबंध होते. वाकाटक राजांना न दुखावता दक्षिणेकडील बारा राज्ये मांडलिक बनविली यात त्याचा मुत्सद्दीपणा दिसून येतो.यामुळेच डॉ. व्हिन्सेंट स्मिथ समुद्रगुप्ताची तुलना नेपोलियनशी करतात.
उत्कृष्ट प्रशासक :
समुद्रगुप्ताची प्रशासनव्यवस्था अत्यंत कार्यक्षम होती. अंतर्गत बंडांचा वेळीच बंदोबस्त केला. बाह्य आक्रमणापासून संरक्षण केले. दक्षिणेतील जिंकलेल्या राज्यांना स्वायत्त मांडलिक राजाचा दर्जा देऊन समुद्रगुप्ताने नियमितपणे खंडण्या वसूल केल्या. या खंडण्यावरच त्याच्या राज्याचा खर्च भागे. साहजिकच प्रजेवर कराचा बोजा कमी पडत असे.
कला आणि साहित्याचा आश्रयदाता :
समुद्रगुप्त हा पराक्रमी तर होताच त्यासोबत विद्वानही होता. त्याला कविराजा म्हटले जाई तथापि त्याने रचलेल्या कविता आता उपलब्ध नाहीत. कवीसोबतच तो संगीतज्ञही होता. त्याला कला मर्मज्ञ म्हणत असत. त्याच्या काळात साहित्य, संगीत व इतर कलांचा विकास झाला. त्याच्या एका नाण्यावर तल्लीन होउन वीणावादन करणाऱ्या समुद्रगुप्ताची प्रतिमा अंकित आहे. समुद्रगुप्ताचे दरबारात कवी हरिसेन, बौध्द पंडित वसुबंधू व असंग यासारखे विद्वान होते.
धर्मशील तथा धर्मसहिष्णू सम्राट :
समुद्रगुप्त हा हिन्दूधर्मी राजा होता. सागर जिल्ह्यातील एरन येथे बांधलेल्या विष्णुमंदिराचे अवशेष आताही तेथे दिसतात. समुद्रगुप्ताने एकीकडे वैदिक संस्कृती जोपासली, अश्वमेध यज्ञ केला, ब्राम्हणांना भरपूर दान- दक्षिणा दिल्या तर दुसरीकडे इतर धर्मांबद्दल त्याचे धोरण सहिष्णुतेचे होते. वसुबंधू आणि असंग यांना चांगली वागणूक दिली. लंकेच्या राजाला बुद्ध गया येथे विहार बांधण्यास अनुमती दिली. यावरून त्याचे सहिष्णुतेचे धोरण स्पष्ट होते.
समुद्रगुप्ताची नाणी :
उत्खननात समुद्रगुप्ताची काही ध्वजांकित नाणी सापडली आहेत. या नाण्याच्या एका बाजूवर काचो गामवाजित्य दिवं कर्मभिरुतमैर्जयति असा उल्लेख आहे. तर नाण्याच्या दुसरया बाजूने सर्वराजोच्छेत्ता असे अंकित केलेले आहे. या नाण्यावर काच हा राजा कोण यावर मतभिन्नता दिसते. कुणाच्या मते काच हा समुद्रगुप्ताचा वडिलभाऊ होता. तर कुणी म्हणतो तो समुद्रगुप्ताचा मुलगा होता. ज्याचे नाव पुढे रामगुप्त वाचण्यात आले.परंतु ही नाणी आणि समुद्रगुप्ताची सापडलेली दूसरी नाणी यावरील साम्य म्हणजे सर्वराजोच्छेत्ता हे बिरुद फ़क्त समुद्रगुप्तालाच लागु पड़ते.
समुद्रगुप्ताने जी नाणी पाडली त्यावरून त्याच्या प्रशासकीय धोरणाचे, साम्राज्यविस्ताराचे, धार्मिक धोरणाचे, पराक्रमाचे, प्रजेविषयी दयाळू धोरणाचे, कला, साहित्य व संगीत याबद्दल रसिकतेचे प्रमाण मिळते. त्याने पडलेल्या नाण्यांवर गोष्टी अंकित केल्या आहेत.
1. पृथ्वी जिंकून स्वतःच्या सत्कर्माने स्वर्ग जिंकत आहे.
2. परशू घेऊन अजिंक्य राजांना जिंकणारा परशूधारी समुद्रगुप्त.
3. वाघाची शिकार करणारा ‘ व्याघ्र पराक्रमी राजा समुद्रगुप्त’.
4. तल्लीन होउन वीणावादन करणारा ‘ महाराजधिराज समुद्र गुप्त.
5. अश्वमेध यज्ञ करून पृथ्वी चे संरक्षण व स्वर्ग जिंकणारा सम्राट समुद्रगुप्त.
6. पिता चंद्रगुप्त आणि माता कुमारदेवी यांच्या प्रतिमा एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सिंहारुढ दुर्गादेवीची प्रतिमा अंकित करणारा सम्राट. या नाण्यांवरून सम्राट समुद्रगुप्ताची योग्यता आपल्या लक्षात येते.
समुद्र्गुप्ताच्या पत्नीचे नाव दत्तदेवी होते. समुद्र्गुप्तानंतर त्याचा मुलगा रामगुप्त हा गादीवर आला.
हरिसेन या, समुद्र्गुप्ताच्या राजदरबारातील विद्वान् कवीच्या मतानुसार समुद्रगुप्त म्हणजे, ‘ धर्ममर्यादा पाळणारा, सत्कर्मी, विद्वांनाचा गुणोंत्कर्ष करणारा, विशाल कीर्तीरूप राज्य उपभोगणारा, अप्रतिम काव्य प्रतिभाशाली, ख्यातनाम पराक्रमी व युध्दात शस्त्रांच्या आघातांच्या खुणांनी अधिकच प्रभावशाली व्यक्तिमत्व लाभलेला, अद्वितीय सम्राट होता. हरिसेन समुद्रगुप्ताला त्याच्या परक्रमाबद्दल ‘ समरशतावरनदक्ष’ म्हणजे शेकडो रणांगणामध्ये युद्ध करण्यात दक्ष असे म्हणतो.
आपण ह्या पोस्ट मध्ये सम्राट समुद्रगुप्त बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर CHANDRAGUPTA MAURYA STORY IN MARATHI बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .
आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरुर कळवा.
आरोग्या बद्दल मराठीत अजून माहिती जाणून घेण्यासाठी मराठीमाहिती या वेबसाईट ला भेट दया .
Good information
thank you sir
Superbbb information abut Samudragupt