छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धतंत्र आणि गनिमी कावा | Chhatrapati Shivaji Maharaj’s Warfare Strategies and Guerrilla Tactics 2026

छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धतंत्र आणि गनिमी कावा | Chhatrapati Shivaji Maharaj’s Warfare Strategies and Guerrilla Tactics 2026

Shivaji Maharaj Attack On Surat In Marathi
photo credit: Google Images

भारतातील इतिहासामध्ये अनेक पराक्रमी राजे झाले आहेत, परंतु आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य, शौर्य आणि अद्वितीय युद्धनीतीमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि  स्थान अतिशय उंच आहे. महाराजांनी केवळ स्वराज्याची स्थापना केली नाही, तर अत्यंत बलाढ्य अशा मुघल आणि आदिलशाही सत्तांना आपल्या युद्धतंत्राने त्यांनी  हादरवून सोडले होते . छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धतंत्र (Chhatrapati Shivaji Maharaj’s Warfare Strategies and Guerrilla Tactics 2026) हे केवळ तलवारीच्या जोरावर नव्हते, तर बुद्धी, नियोजन, वेग, गुप्तता आणि लोकसहभाग यांच्या आधारावर उभे होते. विशेषतः “गनिमी कावा” ही त्यांची युद्धपद्धती आजही जगभरातील लष्करी अभ्यासकांसाठी प्रेरणादायी मानली जाते.

छत्रपती  शिवाजी महाराजांनी लहान वयातच स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते. त्या काळात भारतातील बहुतांश प्रदेश परकीय सत्तांच्या अधीन होता. सामान्य जनता त्रस्त होती. अशा परिस्थितीत थेट मोठ्या सैन्याशी भिडणे शक्य नव्हते. त्यामुळे महाराजांनी वेगळ्या प्रकारचे युद्धतंत्र स्वीकारले. त्यांनी सह्याद्रीच्या डोंगररांगा, जंगल, घाट, अरुंद वाटा आणि किल्ले यांचा अत्यंत चतुराईने उपयोग केला. त्यांच्या युद्धपद्धतीमध्ये भौगोलिक परिस्थितीला मोठे महत्त्व होते.

गनिमी कावा म्हणजे काय ? छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा कसा वापर केला ?

Chhatrapati Shivaji Maharaj’s Warfare Strategies and Guerrilla Tactics 2026

गनिमी कावा म्हणजे शत्रूवर अचानक हल्ला करून त्याला गोंधळात टाकणे आणि लगेच सुरक्षित ठिकाणी सहीसलामत परत जाणे. या तंत्रात शत्रूला थेट युद्धात हरवण्यापेक्षा त्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत करणे महत्त्वाचे असते. महाराजांनी याच पद्धतीने अनेक बलाढ्य सेनापतींना पराभूत केले. शत्रूच्या सैन्याची संख्या किती आहे यापेक्षा त्यांची कमजोरी काय आहे, हे महाराज प्रथम शोधत असत. छत्रपती  शिवाजी महाराजांच्या सैन्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे वेग. त्यांचे मावळे कमी वेळात मोठा प्रवास करू शकत असत. अचानक रात्री हल्ला करणे, शत्रूच्या छावणीवर दबा धरून आक्रमण करणे आणि नंतर जंगल किंवा किल्ल्यांमध्ये सुरक्षित परत जाणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. यामुळे शत्रू कायम भीतीमध्ये राहत असे. महाराजांच्या सैन्याला स्थानिक भूगोलाची उत्तम माहिती होती, त्यामुळे शत्रूला त्यांचा मागोवा घेणे कठीण जात असे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात तोफा, उंट आणि हत्ती नसत. त्यामुळे त्यांना वेगवान हालचाली करता येणे सहज शक्य होते. महाराजांना गनिमी काव्याची प्रेरणा त्यांचे वडील शहाजी राजे यांच्याकडून मिळाली. स्वतः शहाजी राजे निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांच्या तालमीत गनिमी काव्यात तरबेज झाले असे काही इतिहासकारांनी म्हटले आहे. परंतु महाराजांनी गनिमी काव्याचा निर्विवादपणे उत्कृष्टपणे वापर करून आपल्यापेक्षा कित्येकपटीने सैन्यबलात बलाढ्य असलेल्या शत्रूला धूळ चारून स्वराज्याची केवळ स्थानाच नाही तर पूर्णपणे सरंक्षण केले.  एक बाब याठिकाणी सांगू इच्छितो की महाराज हयात असे पर्यंत औरंगजेब कधीही स्वराज्यावर स्वतः चालून आला नाही.

अफजलखानची मोहीम आणि उत्कृष्ट युधानितीचा वापर  : Chhatrapati Shivaji Maharaj’s Warfare Strategies and Guerrilla Tactics 2026

अफजलखानाच्या मोहिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धतंत्र स्पष्टपणे दिसून येते. अफजलखान हा अत्यंत शक्तिशाली पण  क्रूर सेनापती होता. त्याने शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी मोठ्या सैन्यासह मोहीम काढली होती. परंतु महाराजांनी प्रत्यक्ष रणांगणावर लढण्याऐवजी बुद्धीचा वापर केला. प्रतापगडाच्या परिसरातील दाट जंगल आणि डोंगराळ भाग निवडून त्यांनी अफजलखानाला भेटीसाठी बोलावले. परिस्थितीचा अचूक अंदाज घेत त्यांनी स्वतःचे संरक्षण केले आणि योग्य क्षणी अफजलखानाचा पराभव केला. ही घटना गनिमी काव्याचे सर्वोत्तम उदाहरण मानली जाते. अफजलखानाच्या फौजेच्या तुलनेत महाराजांचे सैन्यबळ तुलनेने खूपच कमी होते . शिवाय खानची ताकद अफाट होती. तसेच खान हा दगलबाज देखील होता. त्याने अगोदरच महाराजांचे बंधू थोरले संभाजी राजे आणि कर्नाटकचा राजा यांना विश्वासघाताने ठार मारले होते. या सर्व बाबींचा विचार करून महाराजांनी  खानाच्या विरोधात मोहीम आखली. त्यांनी प्रत्यक्ष मैदानावर आमनेसामने युध्द टाळले. महाराजांनी मोठ्या चातुर्याने खानाला त्याच्या मुख्यफौजेपासून अलग केले आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाचा समूळ नाश केला. याबाबत तुम्ही आमच्या प्रतापगडाच्या पायथ्याशी हा लेख वाचून सविस्तर माहिती घेऊ शकता.

याशिवाय शाहिस्तेखानावरील छापा , उंबरघाटचे युध्द ताचे सुरातेवरील दोन्ही छापे, आग्र्यावरून सुटका या प्रत्येक घटनेंत महाराजांचे चातुर्य आणि गनिमी कावा दिसून येतो.

हे ही वाचा : प्रतापगडाच्या पायथ्याशी 2021 | Pratapgad Makes History In Marathi

छत्रपती शिवाजी महाराज यांची किल्लांच्याबाबत नीती :

शिवाजी महाराजांनी किल्ल्यांना देखील आपल्या युद्धनीतीचा मुख्य भाग बनवले. त्यांनी अनेक किल्ले बांधले तसेच जुन्या किल्ल्यांची दुरुस्ती केली. प्रत्येक किल्ला हा स्वराज्याचा मजबूत आधार होता. किल्ल्यांमुळे सैन्य सुरक्षित राहत असे, तसेच आवश्यकतेनुसार अचानक हल्ले करणे सोपे होत असे. राजगड, रायगड, प्रतापगड, सिंहगड, पन्हाळा आणि विशाळगड यांसारखे किल्ले हे केवळ वास्तू नव्हते, तर स्वराज्याच्या संरक्षणाची भक्कम ढाल होते.

छत्रपती शिवाजी महाराजांची गुप्तहेर व्यवस्था :

शिवाजी महाराजांची गुप्तहेर व्यवस्था देखील अत्यंत प्रभावी होती. युद्धामध्ये माहिती ही सर्वात मोठी ताकद असते, हे महाराजांनी ओळखले होते. त्यामुळे शत्रूच्या हालचाली, सैन्याची संख्या, मार्ग, योजना यांची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी त्यांनी कुशल गुप्तहेर नेमले होते. बहिर्जी नाईक यांसारखे गुप्तहेर महाराजांच्या यशामागील महत्त्वाचे आधारस्तंभ होते. अचूक माहितीमुळे महाराज योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकत असत. अफजलखानाच्या मोहिमेत, शाहिस्तेखानावरील छाप्याच्या वेळी, आग्र्यातुन सुटका केल्यावर तसेच सुरतेच्या दोन्ही छाप्याच्या वेळी बहिर्जी नाईक यांनी पार पाडलेली कामगिरी आपल्यासमोर आहेच.

छत्रपती शिवाजी महाराजांची नीती आणि शिस्त :

महाराजांच्या युद्धतंत्रामध्ये शिस्तीलाही मोठे महत्त्व होते. त्यांच्या सैन्यामध्ये महिलांवर अत्याचार, मंदिरांची तोडफोड किंवा सामान्य जनतेची लूट करण्यास कठोर बंदी होती. त्यामुळे सामान्य लोकांचा महाराजांवर विश्वास होता. लोक स्वतःहून स्वराज्याला मदत करत असत. जनतेचा पाठिंबा हीच महाराजांची खरी ताकद होती.

शिवाजी महाराजांनी आरमारालाही महत्त्व दिले. समुद्रमार्गे होणाऱ्या परकीय आक्रमणांना रोखण्यासाठी त्यांनी सशक्त नौदल उभे केले. सिंधुदुर्गासारखे जलदुर्ग बांधून त्यांनी समुद्रकिनाऱ्यांचे संरक्षण केले. त्या काळात समुद्री संरक्षणाचा विचार करणारे ते मोजकेच भारतीय राजे होते. यावरून त्यांची दूरदृष्टी दिसून येते.

शिवाजी महाराजांचे युद्धतंत्र हे फक्त शक्तीवर आधारित नव्हते, तर योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि परिस्थितीनुसार निर्णय घेण्याच्या क्षमतेवर आधारित होते. त्यांनी कधीही अनावश्यक युद्ध केले नाही. शत्रू बलाढ्य असेल तर थेट सामना टाळून योग्य संधीची वाट पाहणे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे कमी सैन्य असूनही त्यांनी मोठमोठ्या साम्राज्यांना आव्हान दिले.

आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनितीला का महत्व आहे ?

आजच्या आधुनिक काळातही शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्राचा अभ्यास केला जातो. जगातील अनेक लष्करी तज्ज्ञ गनिमी काव्याला प्रभावी युद्धपद्धती मानतात. प्रतिकूल परिस्थितीतही आत्मविश्वास, चातुर्य आणि लोकसहभाग यांच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, हे महाराजांनी सिद्ध केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा वापर करून छत्रपती संभाजी महाराज यांनी 9 वर्षे मुघल फौजेला तोंड दिले. पुढे मराठ्यांनी विशेषतः संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी मुघल फौजेला कसे जेरीस आणले होते आणि स्वराज्याचे मुघल फौजेपासून कसे रक्षण केले होते याचे उदाहरण आपल्यासमोरआहे. तसेच याबाबत आपल्यासमोर व्हियेतनामचे उदाहरण आहेच. अमेरिकेसारख्या बलाढ्य महाशक्तीला व्हियेतनामने कसे जेरीस आणले होते याला इतिहास साक्षी आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर महान रणनीतीकार होते. त्यांनी आपल्या बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या जोरावर स्वराज्याची मजबूत पायाभरणी केली. त्यांचे युद्धतंत्र आणि गनिमी कावा हे भारतीय इतिहासातील अमूल्य वारसा आहे. महाराजांचे जीवन आणि त्यांची युद्धनीती आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. संकट कितीही मोठे असले तरी धैर्य, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर विजय मिळवता येतो, हा संदेश शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आपल्याला मिळतो.

मित्रांनोतुम्हाला आमचा हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा आणि आवडल्यास आपल्या मित्रांना जरूर शेयर करा.

 

Spread the love

Leave a Comment