Table of Contents
Bhimbetka Guha Information In Marathi | जागतिक वारसा स्थळ : भीमबेटका मध्यप्रदेश
युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारतातील वेगवेगळ्या स्थळांचा समावेश आहे. त्यापैकीच एक असलेल्या भीमबेटका म्हणजेच Bhimbetka Guha या ठिकाणची माहिती आपण आजच्या लेखात घेऊ या.
भीमबेटका कोठे आहे ?
भीमबेटका मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यात आहे. भीमबेटका हे विंध्य पर्वताच्या रांगांत स्थित आहे. माळवा पठाराच्यासमोर असलेल्या टेकड्यांच्या मध्ये होशंगाबाद-भोपाल रेल्वे मार्गावरील ओबेदुल्लागंज आणि बरखेडा या रेल्वे स्थानकामध्ये भीमबेटका आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपालपासुन भीमबेटका दक्षिण-पूर्व दिशेस सुमारे ४५ किमी. लांब आहे.
भीमबेटका काय आहे ?
भीमबेटका या ठिकाणाला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, भोपाल मंडलने ऑगष्ट १९९० मध्ये राष्ट्रीय महत्वाचे स्थळ म्हणून घोषित केले. तसेच भीमबेटका म्हणजेच Bhimbetka Guha या पर्वतीय गुहांचा समावेश जागतिक वारसा स्थळांत आहे. भीमबेटकाला २००३ मध्ये जागतिक वारसा स्थळांत समाविष्ट करण्यात आले. भीमबेटका हे खासकरून प्रागैतिहासिक कलेसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या भारतातील आदिम संस्कृतीचे अवशेष याठिकाणी आढळून आले आहेत.सुमारे एक लाख वर्षापूर्वी येथे मानवी वस्ती असावी असा संशोधकांचा अंदाज आहे.
भीमबेटकाचा परिसर हा सुमारे १० चौ.किमी. परिसरात पसरलेला आहे. यामध्ये एकुण आठशे प्रस्तर गुहा आहेत. त्यापैकी पाचशे प्रस्तरालयांत चित्रे काढलेली दिसून येतात. या गुहांमधील चित्रे एकाच कालखंडातील नाहीत तर ती भिन्न कालखंडातील आहेत. संशोधकांनी या चित्रांचा कालावधी ठरविला आहे. संशोधकांच्या मते या चित्रांचा कालावधी उत्तर पुराश्मयुग आणि मध्याश्मयुग आहे. म्हणजे साधारणता ३०००० वर्षापुर्वी ही भित्तिचित्रे असावी असे मानले जाते.
भीमबेटका हे नाव कसे पडले ?
महाभारतातील महाबलाढ्य भीम याच्याशी भीमबेटका या नावाचा संबंध जोडला जातो. या परिसरातील टेकड्यांवर भीमाची बसण्याची जागा होती. फार वर्षापुर्वी भीम त्या ठिकाणी आला आणि त्याने तेथे बैठक मारली अशी आख्यायिका आहे. भीमाची बैठक ती भीमबैठक. या भीमबैठकाचा अपभ्रंश पुढे भीमबेटका झाला असे मानल्या जाते. मात्र मध्यप्रदेशात भीमबैठक म्हनुनच या ठिकाणाला ओळखले जाते.
भीमबेटकाचा शोध कसा लागला ?
भीमबेटका येथील गुहांचा शोध महाराष्ट्रीयन पुरातत्त्व संशोधकाने लावला. जेव्हा श्रीधर विष्णु वाकणकर हे पुरातत्त्व संशोधक रेल्वेने दिल्लीवरून भोपालला जात होते तेव्हा विंध्य पर्वतांच्या रांगात डोंगरात काहीतरी खोदलेले दिसले. त्यांनी सोबतच्या स्थानिक प्रवाशांना या बाबत माहिती विचारली. त्या गुहा असून त्यामध्ये जनावरे असल्याचे श्री. वाकणकर यांना कळले. समोरच्या स्टेशनवर रेल्वेचा वेग कमी झाल्यावर त्यांनी रेल्वेबाहेर उडी घेतली. श्री. वाकणकर हे एकटेच त्या डोंगरातील गुहांकडे निघाले. तेथे गेल्यावर त्यांना आदिम संस्कृतीतील अवशेषांचा बहुमोल असा ठेवा मिळाला. त्या ठिकाणी आदिमानवाने विविध प्राणी,पक्षी, झाडे, आणि शिकारीची दृश्ये अशी चित्रे त्यांना आढळली. अतिप्राचीन काळातील ही भित्तिचित्रे नैसर्गिक रंगातील काढलेली होती.
भीमबेटकातील चित्रांमध्ये काय आहे ?
भीमबेटका येथील चित्रे हे अनेक कालखंडातील आहेत. भीमबेटका म्हणजेच Bhimbetka Guha येथील चित्रांमध्ये मुख्यतः लाल आणि पांढरा या रंगांचा वापर जास्त केलेला आढळतो. तर काही चित्रांमध्ये हिरवा,पिवळा आणि काळा हे रंग सुध्दा वापरलेले आहेत.बरीचशी चित्रे वन्यप्राणी आणि शिकार यांच्याशी निगडित आहेत. ही चित्रे प्रागैतिहासिक कालखंडातील आहेत. तर त्या तुलनेत अलीकडच्या काळातील चित्रे ही पाळीव प्राणी,मिरवणुका आणि लढाईचे प्रसंग यावर आधारित आहेत. लढाईच्या प्रसंगाच्या चित्रांमध्ये हत्तीवर आणि घोड्यावर स्वार असलेले पुरुष ढाली-तलवारी , भाले आणि धनुष्यबाण इत्यादि शस्त्रानी युध्द करताना चित्रित केलेले आहे. या वरून घोडा हा प्राणी फार पूर्वीपासुन भारतात आहे हे आपल्या लक्षात येते.
प्रागैतिहासिक कालखंडातील चित्रे नैसर्गिक शैलीत काढलेले आहेत. त्यातील प्राणी हालचाली करताना दिसतात. तर ऐतिहासिक कालखंडातील चित्रे हे कृत्रिम वाटतात. त्यामधील प्राणी स्थिर वाटतात. या चित्रांवरून प्रागैतिहासिक आणि ऐतिहासिक कालखंडातील मानवांची सौंदर्यदृष्टी आणि कलाकुशलता दिसून येते. त्या शिवाय या चित्रांवरून त्या त्या कालखंडातील लोकजीवनाविषयी उपयुक्त माहिती आपल्याला मिळते.
भीमबेटकातील पुरातत्त्वीय अवशेष :
भीमबेटका येथील उत्खननात पुराश्मयुगीन अवजारे सापडली आहेत. त्यामध्ये हातकुऱ्हाडी व फरशी हत्यारे मिळाली आहेत. ही अवजारे दोन प्रकारच्या क्वार्टझाईट दगडांपासून बनाविलेली आहेत. हातकुऱ्हाडी व फरशी हत्यारे ही गडद भुऱ्या रंगाच्या , तर छिलका अवजारे पिवळ्या रंगाच्या क्वार्टझाईट दगडांपासून बनाविलेली आहेत. मध्याश्मयुगीन लोकांनी पाटा आणि वरवंटा यांचाही वापर केल्याचे आढळले आहे. येथे उत्तर अशुलियन काळातील अवजारे मिळाली आहेत.
भीमबेटका येथील उत्खननात सापडलेली अवजारे यांचा कालावधी निश्चित करण्यासाठी रेडिओकार्बन पध्दतीचा वापर करण्यात आला आहे. त्यावरून येथील सापडलेली अवजारे वापरणारी वसाहतीचा कालावधी आजपासून १५०००ते १७००० वर्षापुर्वीचा आहे.
भीमबेटका या ठिकाणाला भेट देऊन आपण भारतातील प्रागैतिहासिक कालखंडातील कलांचा अनुभव घेऊ शकतो.
आपण ह्या पोस्ट मध्ये भीमबेटका गुफा बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर Pyramid Of Giza In Marathi बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .
संदर्भ : मराठी विश्वकोश
तुम्हाला Blogging In Marathi बद्दल अजून जाणून घ्यायचे असेल तर मराठी जीवन वेबसाईट ला भेट दया .
Thank u
this is very important information.
thank you sir