Table of Contents
RAW Intelligence Campaign 1 Information In Marathi | रॉ चा गनिमी कावा
रॉ म्हणजेच रिसर्च अॅनालिसिस विंग (RAW – Research Analysis Wing ) ही भारताची केवळ परराष्ट्रांत हेरगिरी करणारी गुप्तचर यंत्रणा आहे. रॉ बद्दल प्रत्येक भारतीयांच्या मनात कुतूहल असणे स्वाभाविक आहे. तसेही गुप्तहेरांच्या कथा आपण मोठ्या उत्सुकतेने वाचत असतो. आजच्या या लेखात आपण रॉ चा गनिमी कावा RAW Intelligence Campaign 1 Information In Marathi याबाबत माहिती जाणून घेऊ या.
इंडियन एअरलाइन्स फॉकर एफ – 27 Indian Airlines Fokker AF – 27 विमानाचे अपहरण : RAW Intelligence Campaign 1 Information In Marathi
ही घटना आहे जानेवारी 1971 ची. त्यावेळी पूर्व पाकिस्तान म्हणजे आजच्या बांगलादेशमध्ये अराजकता माजली होती. पाकिस्तानपासून हा प्रांत स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न करत होता. भारत – पाक युद्ध होणे अटळ होते.
30 जानेवारी 1971 ला काश्मीरमधील श्रीनगर विमानतळावरून इंडियन एअरलाइन्स फॉकर एफ – 27 विमानाने सकाळी जवळपास साडे अकराच्या सुमारास उड्डाण केले. या विमानाचे नाव होते गंगा. हे विमान जम्मुला थांबून दिल्लीला रवाना होणार होते. त्यावेळी विमानात सुमारे 26 प्रवासी होते.जम्मू जवळ येताच प्रवाशांमधील दोघे जण अचानक उठले. त्यातील एक वैमानिकाच्या केबिन मध्ये गेला तर दुसऱ्याने हातबॉम्बने प्रवाशांना धमकावले. केबिनमधील दहशतवाद्याने बंदुकीच्या जोरावर विमान लाहोरकडे नेण्यास भाग पाडले. हेच गंगा अपहरण नाट्य होय.
त्या दोन दहशतवाद्यांची नावे होती हाशिम कुरेशी आणि अश्रफ कुरेशी. दोघे चुलतभाऊ होते. मूळचे काश्मीरचे. ते दोघे मकबूल बट या दहशतवाद्याच्या ‘जम्मू – काश्मीर नॅशनल लिबरेशन फ्रंट’ या दहशतवादी संघटनेशी संलग्न होते.अर्थातच भारतातील या दहशतवादी संघटनांची सूत्रधार होती पाकिस्तानची आय एस आय – इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स.
विमान दुपारी दीड दोन च्या सुमारास लाहोर विमानतळावर उतरले. अल – फतह ही नॅशनल लिबरेशन फ्रंट या दहशतवादी संघटनेचे 36 दहशतवादी भारताच्या कैदेत होते. ही दहशतवादी संघटना भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मिरच्या स्वातंत्र्यासाठी कार्यरत होती. कैदेत असलेल्या या 36 दहशतवाद्यांना मुक्त करण्याची मागणी तसेच पाकिस्तानने त्या दोघांना राजकीय आश्रय द्यावा अशी मागणी हाशिम कुरेशी याने केली. भारत सरकारने यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे म्हटले. त्याचप्रमाणे भारत दहशतवाद्यांच्या पुढे झुकणार नाही हे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी स्पष्ट केले.
पाकिस्तान मात्र या घटनेने खुश झाला. कुरेशी बंधूंना स्वातंत्र्यसैनिक म्हणून संबोधल्या गेले. हाशिम कुरेशी पत्रकारांना मुलाखती देत होता. पाकिस्तानी अधिकारी हाशिम कुरेशीला भेटत होते. लोक लाहोरच्या विमानतळावर गर्दी करीत होते. पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री झुल्फिकार अली भुट्टोने हाशिम कुरेशीची भेट घेतली. लवकरच आय एस आय चे अधिकारी, मकबूल बट यांनी हाशिम कुरेशीची भेट घेतली. त्या सर्वांना भारताची नाचक्की करायची होती. त्यांनी विमानातील सर्व प्रवाशांची सुटका केली आणि विमानाला आग लावली.
भारताने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. आतंरराष्ट्रीय समुदायसमोर दाद मागितली. भारतामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. भारत केवळ पाकिस्तानच्या विरोधात तक्रारच करतो. पाकिस्तान आणि दहशतवादी यांच्यावर कडक कारवाई करत नाही. अशी जनभावना निर्माण झाली.
भारताकडून पाकिस्तानचा निषेध आणि प्रतिक्रिया : RAW Intelligence Campaign 1 Information In Marathi –
भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी ( Indira Gandhi) पाकिस्तानी विमांनाना भारतीय हवाई हद्दीतून उड्डाण करण्यास पूर्णपणे बंदी घातली. भारतीय जनमानस मात्र या कारवाईने खुश नव्हते. परंतु हा झालेला सर्व घटनाक्रम म्हणजे भारताचा विजय होता !
खरोखरच ही घटना म्हणजे भारताचा एक नवीन विजयच होता. वर सांगितल्याप्रमाणे सर्व घटकाक्रमाची सूत्रधार होती भारताची गुप्तहेर संघटना रॉ !! आणि या अपहरण नाट्याच्या मागे हात होता तो रॉ चे प्रमुख रामेश्वर नाथ काव. रॉ चे पहिले प्रमुख.
रॉ चा गनिमी कावा : RAW Intelligence Campaign 1 Information In Marathi
जानेवारी 1971 च्या दुसऱ्या आठवड्यात सीमा सुरक्षा बलाच्या ( BSF) जवानांनी हाशिम कुरेशी याला पाकिस्तानातून भारतात घुसखोरी करतांना पकडले. भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी त्याची चौकशी केली असता तो आय एस आय चा एजन्ट असल्याचे समजले. तसेच आय एस आय चा कट ही समजला. आय एस आय ने हाशिम कुरेशी याच्यावर एका विमानाच्या अपहरणाची जबाबदारी सोपविली होती. आणि ते अपहरण ही कोणत्याही सर्वसाधारण विमानाचे नव्हते.
ज्या विमानाचे अपहरण करायचे होते ते एका अतिमहत्त्वाच्या व्यक्तिसकट करायचे होते. ती व्यक्ती म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधींचे सुपुत्र राजीव गांधी ( Rajiv Gandhi ) यांचे. त्यावेळी राजीव गांधी वैमानिक होते. ते ज्या विमानाचे वैमानिक असतील त्या विमानाचे अपहरण करायचे असा कट आय एस आय ने केला होता. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधींच्या पुत्राचे अपहरण करून पाहिजे त्या मागण्या मान्य करून घेणे असा डाव आय एस आय चा होता.
सुदैवाने हा कट भारताला माहित पडला. लगेच ही माहिती रॉ चे प्रमुख रामेश्वर नाथ काव यांना दिल्या गेली. त्यानंतर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. हाशिम कुरेशी हा जरी आय एस आय साठी काम करत असला तरी तो मूळचा रॉ चा हस्तक होता. रॉ नेच त्याला अल – फतह या दहशतवादी संघटनेत सामील होण्याकरिता पाकव्याप्त काश्मीर मध्ये पाठविले होते.
परंतु हा हाशिम कुरेशी मकबूल बटच्या सानिध्यात आल्यावर आय एस आय साठी काम करू लागला.
आय एस आय ने भारताच्या विमानाचे अपहरण करायचे ठरविले त्याला आधार म्हणून विमान अपहरणाची एक घटना नुकतीच घडली होती. 18 जून 1969 ला एरी ट्रियान लिबरेशन फ्रंटच्या तीन दहशतवाद्यांनी इथिओपियाच्या बोईंग 707 या विमानाचे अपहरण केले आणि ते विमान कराचीला आणले होते. त्याच धर्तीवर भारताचे विमानाचे राजीव गांधी सकट अपहरण करायचे, पाहिजे त्या मागण्या मान्य करून भारताची नाचक्की करणे आणि जगाचे लक्ष पूर्व पाकिस्तानातून इतरत्र वळविणे. ही अशी योजना आखली होती. मकबूल बट आणि हाशिम कुरेशी यांच्यावर आय एस आय ने जबाबदारी सोपविली. हाशिम कुरेशीला आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले होते.
रॉचे प्रमुख रामेश्वर नाथ काव ( R.N. Kav) यांना ही बाब समजल्यावर त्यांनी पाकिस्तानचा डाव त्यांच्यावरच उलटवण्याचे ठरविले. त्यांनी एक खास योजना आखली आणि ती पंतप्रधान इंदिरा गांधींच्या समोर ठेवली. त्यांनी लगेच त्या योजनेला मंजुरी दिली. त्या योजनेनुसार रॉ च्या अधिकाऱ्यांनी हाशिम कुरेशी ला दोन पर्याय ठेवले एक म्हणजे तुरुंगात खितपत पडणे आणि दुसरा म्हणजे रॉ च्या म्हणण्यानुसार करणे. हाशिम कुरेशी ने रॉ च्या म्हणण्यानुसार करायचे मान्य केले.
आणि सुरू झाले विमान अपहरण नाट्य ! योजना तीच जी आय एस आय ने बनविली होती. मात्र त्यात राजीव गांधी वैमानिक नव्हते. विमान देखील इंडीयन एअरलाईन्सच्या ताफ्यातील सर्वात जुने होते. ते विमान सेवेत नव्हते. अपहरण नाट्याच्या काही दिवस अगोदर ते विमान पुन्हा सेवेत दाखल करण्यात आले ते या योजनेच्या अंमलबजावणी साठी.
हाशिम कुरेशीकडून काय करून घ्यायचे,काय बोलायला लावायचे ते सर्व त्याला नीट पढवण्यात आले.
गंगा अपहरण नाट्य झाले. भारताचे केवळ एक जुनाट विमान नष्ट झाले. परंतु याद्वारे भारताचे बरेच उद्देश सफल झाले. पाकिस्तानची नाचक्की झाली. आतंरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान हा दहशतवाद समर्थक राष्ट्र आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे होऊ घातलेल्या भारत – पाक युद्ध जे पूर्व पाकिस्तानाच्या म्हणजे बांगलादेशाच्या निर्मितीसाठी होणार होते, त्यात पाकिस्तानच्या युद्ध तयारित खोडा घालणे. कारण पूर्व पाकिस्तान मध्ये लष्कर, रसद पुरवठा वगैरे पाठविण्यासाठी एकच हवाई मार्ग होता आणि तो भारतातूनच जात होता.
गंगा अपहरण नाट्यमुळे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाकिस्तानसाठी हवाई मार्ग बंद केला. कालांतराने भारत – पाक युद्ध होऊन भारत जिंकला आणि बांगलादेशची निर्मिती झाली.
हा होता रॉ चा गनिमी कावा.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरुर कळवा.
तुम्हाला जर भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बद्दल माहिती घ्यायची असेल तर पुढील लिंकवरून तुम्ही माहिती घेऊ शकता.
आयरन लेडी इंदिरा गांधींचे इतिहास माहिती 2021 | Indira Gandhi Information In Marathi
तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाइट ला भेट देऊ शकता.
स्त्रोत : रॉ भारतीय गुप्तचरसंस्थेची गुढगाथा – श्री. रवि आमले