Table of Contents
Afzalkhan And Aurangjeb 1657 | आणि औरगंजेब अफजलखानाच्या हातून वाचला
अफजलखान( Afzalkhan) हा आदिलशाहीतील एक नावाजलेला सरदार होता. शरीराने उंच आणि धिप्पाड असलेला हा अफजलखान अत्यंत पराक्रमी होता.अफजलखान हा जेवढा शूर होता तेवढाच क्रूर पण होता. सामान्य घराण्यात जन्माला आलेल्या खानाने आपल्या पराक्रमाने आदिलशाहीत नाव कमाविले होते. अफजलखानाने कर्नाटकात अनेक राज्यांना आपल्या पराक्रमाने आदिलशाहीचे मांडलिक बनविले होते. अशा या कर्तबगार आणि तडफदार अफजलखानाने आपल्या पराक्रमाने औरंगजेबालाही संकटात टाकले होते. नशीब बलवत्तर म्हणून औरंगजेब अफजलखानाच्या ( Afzalkhan And Aurangjeb 1657 ) हातून वाचला. आजच्या या लेखात आपण अफजलखानाच्या हातून औरंगजेब कसा वाचला त्याबाबत माहिती घेऊ या.
अफजलखान आणि औरंगजेब : Afzalkhan And Aurangjeb
ही घटना इ.स. १६५७ ची आहे. शाहजहान हा त्यावेळी दिल्लीचा बादशहा होता. त्यावेळी शहजादा औरंगजेब (Aurangjeb) दख्खनमध्ये होता. बीदर आणि कल्याण या परिसरात मुघल आणि आदिलशाही यांच्यात चकमकी सुरु होत्या. शहजादा औरंगजेबाने आदिलशाहच्या ताब्यातील बीदर आणि कल्याण येथील किल्ले जिंकले. मुघल फौजा या परिसरात धुमाकुळ घालीत होत्या. मुघल फौजेला रोखण्यासाठी विजापुरहुन आदिलशाही फौज निघाली. या फौजेचे नेतृत्व खान महम्मद करीत होता. खान महम्मद हा आदिलशाहीतील एक नावाजलेला सेनानी होता. खान महम्मद या सरसेनापतीच्या नेतृत्वाखाली भली मोठी फौज विजापुरहुन निघाली.
विजापुरच्या फौजेने औरंगजेबला(Aurangjeb) कोंडीत पकडले :
विजापुरच्या फौजेने शहजादा औरंगजेब आणि त्याच्या फौजेला घेरले आणि अडचणीच्या ठिकाणी कोंडीत पकडले.चारी बाजूंनी मुघल फौजेला विजापुरच्या फौजेने घेरले. अफजलखानने या लढाईत पराक्रमाची शर्थ केली. मुघल फौजेची पुरती कत्तल होणार असे वाटू लागले. खुद्द मुघल शहजादा औरंगजेब हा मारल्या जाईल किंवा कैद होईल अशी परिस्थिती निर्माण झाली.
शहजादा औरंगजेबची (Aurangjeb) खान महम्मदकडे याचना आणि सुटका :
अफजलखान (Afzalkhan) आणि विजापुरी सैन्याचा पराक्रम पाहता दयायाचने शिवाय पर्याय नाही हे शहजादा औरंगजेबच्या लक्षात आले. त्याने गुप्तपणे अत्यंत दीनवाण्या शब्दात खान महम्मद एक पत्र पाठविले. त्यावेळी खान महम्मद नमाज पढत होता. स्वताच्या जीवाची याचना करताना औरंगजेबने मुत्सद्दीपणे लिहिले की, “मुघलांचा हा शहजादा आपल्या जीवाची याचना करीत आहे. तेव्हा आपण माझा बचाव करावा. माझ्या जीविताला वा प्रतिष्ठेला जर धक्का लागला तर दिल्लीत असलेल्या माझ्या वडिलांना फार क्रोध येइल.”
असे याचनेचे तथा धमकीचे पत्र शहजादा औरंगजेबने विजापुरच्या सरसेनापती खान महम्मदला पाठविले. खान महम्मद हा खरोखरच विजापुरचा निष्ठावान सेनानी होता. शहजादा औरंगजेबचे जर काही बरेवाईट झाले तर खरच दिल्लीहून भल्यामोठ्या फौजेचे संकट विजापुरवर येईल आणि आदिलशाही सल्तनत धोक्यामध्ये येईल. म्हणून शहजादा औरंगजेबला गुप्तपणे जाऊ देणे हेच आदिलशाहीच्या भविष्यासाठी योग्य राहील असा विचार त्या निष्ठावान सेनानीने केला. त्याने शहजादा औरंगजेबला वाट मोकळी करुन दिली.
अफजलखाचा क्रोध आणि खान महम्मदची हत्या :
खान महम्मद आणि शहजादा औरंगजेब यांच्यातील पत्रव्यवहार अफजलखानास माहित नव्हता. आपल्या ताब्यात मुघल शहजादा येणार, मुघलांची प्रचंड हार होणार या कल्पनेने अफजलखान खुश होता. परंतु शहजादा औरंगजेब सहीसलामत निसटुन गेल्याचे कळताच अफजलखान भयंकर संतापला. जेव्हा त्याला कळले की, शहजादा औरंगजेबच्या निसटुन जाण्यामागे सरसेनापती खान महम्मद याचा हात आहे तेव्हा अफजलखान अधिकच चिडला. भयंकर आवेशात अफजलखान विजापुरच्या दरबारात गेला. तेथे त्याने सर्व हकीकत सांगितली.
त्यानंतर आदिलशहाने खान महम्मद यास त्वरित दरबारात हाजीर होण्यास फर्माविले. खान महम्मद जसा विजापुरच्या मक्का दरवाज्यातून आत शिरला तसेच त्यावर हल्ला करून त्यास मारले. अशाप्रकारे आदिलशाहीचा निष्ठावान सेनानी खान महम्मदचा अंत झाला. मात्र शहजादा औरंगजेब अफजलखानाच्या हातून वाचला.
तुम्हाला आमचा हा लेख कसा वाटला ते जरुर कळवा.
तुम्हाला जर प्रतापगडच्या लढाईबाबत वाचायचे असेल तर पुढील लिंकवरून माहिती घेऊ शकता.
प्रतापगडाच्या पायथ्याशी 2021 | Pratapgad Makes History In Marathi
तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाइट ला पण भेट देऊ शकता.
स्त्रोत : राजा शिवछत्रपती ( लेखक – बाबासाहेब पुरंदरे )