“स्वाभिमानाने कसे जगावे ते छत्रपती शिवरायांनी शिकविले, तर स्वाभिमानाने कसे मरावे हे माझ्या शंभू राजाने शिकविले.” इतिहासात आपल्या प्रखर पराक्रमाने, हौतात्म्याने अमर झालेले स्वराज्याचे दुसरे छत्रपती,स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांची आज १४ मे २०२१ रोजी ३६४ वी जयंती. आजच्या या लेखात Sambhaji Maharaj history in marathi language 2021 म्हणजेच स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज याबाबत माहिती बघणार आहोत. चला तर मग बघू या छत्रपती संभाजी महाराज यांचा रोमांचित करणारा इतिहास.
Table of Contents
Sambhaji Maharaj history in marathi language 2021| छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल माहिती
छत्रपती संभाजी महाराज यांचे बालपण :
१४ मे १६५७ किल्ले पुरंदर येथे शंभू राजांचा जन्म झाला. जन्मानंतर दोन वर्षांनीच महाराणीसाहेब सईबाई यांचे आजारपणात निधन झाले. त्यामुळे शंभू राजांचे बालपण राजमाता जिजाऊसाहेब यांच्या छत्रछायेखाली गेले. जिजामाता यांनीच संभाजी महाराज यांना कला,शास्त्र,दांडपट्टा, तलवार, भाला आणि बरची च्या खेळात तरबेज केले.
बालपणापासूनच शंभू राजांना राजकारणातील डावपेच शिकायला मिळाले. जेव्हा पुरंदरचा तह झाला तेव्हा शंभू राजांना मिर्झा राजाकडे पाठविले गेले. १२जून १६६५ रोजी संभाजी राजे मुघलांचे पंच हजारी सरदार बनले. त्यावेळी ते ८ वर्षांचे होते. त्यानंतर लगेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत शंभू राजांना आग्र्याला बादशहा औरंगजेब याच्या भेटीला जावे लागले. तेथे शंभू राजांना मुघल राजकारणाची जवळून ओळख आणि पारख झाली.
छत्रपती संभाजी महाराज यांचे साहित्य :
छत्रपती संभाजी महाराज हे एक संस्कृत पंडित होते. असे म्हटले जाते की, शंभू राजे यांना अनेक भाषा अवगत होत्या. शंभू राजांनी बुधभुषण, नायिकाभेद ,नखशिख आणि सातसतक हे ग्रंथ लिहले. त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी बुधभुषण हा ग्रंथ लिहला. यावरून शंभू राजे हे सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित होते हे स्पष्ट होते.
शंभू राजे हे अतिक्षय तल्लख बुद्धीचे, कर्तबगार,दूरदर्शी अनेक विद्या व कलांचे अधिपती व सर्वगुणसंपन्न असे होते.
फ्रेंच प्रवासी अबे कॅरे याचे छत्रपती संभाजी महाराज यांचेबाबत मत :
फ्रेंच प्रवासी अबे कॅरे याने शंभू राजे यांच्या बाबत आपले मत व्यक्त केले आहे. तो म्हणतो,” हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या वडिलांच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजी राजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचिही बरोबर करील इतका तो तयार आहे.तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरूपवान आहे.सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजी महाराज सारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजी राजांच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते.”
छत्रपती संभाजी राजांचे स्वराजातुन निघून जाणे :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकानंतर अष्टप्रधान मंडळातील काही मंत्री आणि स्वराज्याचे युवराज असलेले शंभू राजे यांच्यात खटके उडत गेले. त्यामध्ये अन्नाजी दत्तो हा प्रमुख होता. शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक प्रसंगी संभाजी राजांचाही पट्टाभिषेक झाला. राज्यभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज यांना स्वतंत्र सैन्य देऊन आदिलशाहीवर पाठविले. त्यात संभाजी राजांनी विशेष कामगिरी केली. भागानगरकरांपासून खंडणी वसूल केली. आदिलशाहीतील मुलुखातून लूट वसूल केली.
फोंडा किल्ल्याचा बंदोबस्त त्यांनी व्यवस्थित केला आणि पोर्तुगीजांवर दहशत निर्माण केली. नेमक्या याच कामात अण्णाजी दत्तो अपयशी ठरला होता.
शिवाजी महाराज मोहिमेवर असताना त्यांच्या अनुपस्थितीत भेटायला आलेले लोक संभाजी राजांना भेटल्यावर त्यांच्या सरळ स्वभावाचे कौतुक करत. नेमके हेच गडावरील कारभाऱ्यांना सहन होत नव्हते.
शिवाजी महाराजांनी कर्नाटक मोहिमेची तयारी केली. मुघलांकडून स्वराज्यावर आपल्या अनुपस्थितीत आक्रमण नको म्हणून मुघलांशी तह करण्याचे ठरविले. या तहात खंडणी सोबतच संभाजी राजांना मुघलांचा पंच हजारी मनसबदार म्हणून ठेवणे हे एक महत्त्वाचे कलम होते. वाटाघाटीत वेळ घालवायचा आणि तेवढ्या वेळेत कर्नाटक मोहिम यशस्वी करून यायची असा शिवाजी महाराजांचा बेत होता. संभाजी महाराज आणि मंत्रिमंडळ यांच्यात अधिक वाद निर्माण व्हायला नको म्हणून संभाजी राजांना कोकण प्रांताची जबाबदारी दिली.
कर्नाटक मोहिम यशस्वी करून शिवाजी महाराज १६७८ मध्ये परत आले. त्यानंतर १६७८ च्या डिसेंबर महिन्यात संभाजी राजे मुघलांकडे निघून गेले. तेथे ते दिलेर खानाला जाऊन भेटले. त्यानंतर डिसेंबर १६७९ मध्ये ते स्वराज्यात परत आले.
संभाजी राजे आणि महाराजांची भेट १३ जानेवारी १६८० ला झाली. त्यानंतर संभाजी राजांनी मुघलांच्या प्रदेशात लुटालुट केल्याचे काफिखान सांगतो. शिवाजी महाराजांनी संभाजी राजांच्या ताब्यात वीस हजार सैन्य दिले होते. संभाजी राजांनी औरंगाबाद, बुऱ्हाणपूर प्रांतात धुमाकूळ घातला होता. महाराजांनी त्यांना पन्हाळा प्रांत दिला होता. तेथूनच ते त्या प्रांताचा कारभार पाहत होते. फ्रेंचांसोबतच्या पत्रव्यवहार सुभेदार आणि युवराज म्हणून करतांना दिसतात.
शिवाजी महाराजांचे निधन झाल्यावर स्वराज्यातील सुभेदार हे संभाजी राजांच्या कडेच आले. खुद्द सेनापती हंबीरराव मोहिते यांनी संभाजीराजांची बाजू घेतली यातच सर्व आले.
छत्रपती संभाजी महाराज यांचे राज्यरोहण :
छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन ३० एप्रील १६८० ला निधन झाले. त्यानंतर २० जूलै १६८० ला शंभू राजांनी राज्यकाराभाराची सूत्रे हाती घेतली. १६ जानेवारी १६८१ ला रीतसर शंभू राजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला.
औरंगजेबचे स्वराज्यावर आक्रमण :
जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हयात होते औरंगजेब स्वत: दख्खनच्या मोहिमेवर आला नाही. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर खुद्द औरंगजेब आपल्या नेतृत्वाखाली भलीमोठी फ़ौज घेऊन दख्खनवर म्हणजे स्वराज्यावर चालून आला. असे म्हणतात की औरंगजेबची फ़ौज ही मराठ्यांपेक्षा पाचपटीने जास्त होती.
यावेळी शंभू राजांची खरोखरच खडतर परीक्षा होती. त्यांना एकाच वेळी परकीय शत्रू आणि स्वकीय जे विरोधात होते त्यांच्याशी लढायचे होते. प्रसंग फार बाका होता. औरंगजेबची फ़ौज लष्करीदृष्टया सामर्थ्यशाली होती. त्याशिवाय सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज हेही शत्रू टपून बसले होतेच.
तरीही शंभू राजांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारुवृत्तीचे दर्शन घडून येते. त्यांनी एकाच वेळी औरंगजेबची, सिद्दी आणि पोर्तुगीज अशा तीनही आघड्यावर चढाई सुरु ठेवली.
रामसेजचा किल्ला लवकरच जिंकु ही मुघलांची आशा मराठ्यांनी धूळीस मिळविली. शंभू राजांनी बुरहानपुर शहर लुटून मुघलांचे नाकच कापले. मराठ्यांच्या फौजा औरंगजेबच्या फौजांना बेजार करीत होत्या.
शंभू राजांनी त्यांच्या कारकिर्दीत शरणागतीचा एकही तह केला नाही की एकाही युद्धात हार पत्करली नाही. प्रतिकूल परिस्थितीत केवळ आपल्या पित्याचे राज्याच राखले नाही तर त्यात वृद्धीही केली.
छत्रपती संभाजी महाराजांना कैद आणि त्यांचे हौतात्म्य :
औरंगजेबच्या फौजा स्वराज्यात चौफेर पसरल्या होत्या. त्या कारणाने शंभू राजांना सुद्धा आपल्या सैन्याच्या तुकड्या वेगवेगळ्या ठिकाणी पाठवाव्या लागल्या. अशातच शंभू राजे महत्वाच्या कामानिमित्ताने कोकणात संगमेश्वर येथे असतांना १ फेब्रुवारी १६८९ ला मुघल सरदार मुकर्रबखान याने शंभू राजांवर हल्ला केला. यावेळी शंभू राजांसोबत कमी सैन्य होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे मुघलांचा हा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शेवटी शंभू राजे आणि त्यांच्या सोबत कवी कलश यांना कैद करण्यात आले.
मराठ्यांनी शंभू राजांना कैदेतुन मुक्त करण्याचे बरेच प्रयत्न केले. पण प्रत्येक वेळी त्यांना अपयश आले.
औरंगजेबच्या पुढे बहादुरगड येथे शंभू राजे आणि कवी कलश यांना आणले गेले. स्वराज्यातील सर्व किल्ले, खजिना औरंगजेबला दिल्यास जीवदान देण्याची अट शंभू राजांनी मान्य केली नाही. शेवटी अत्यंत हाल करुन ११ मार्च १६८९ ला तुळापुर येथे शंभू राजे आणि कवी कलश यांना ठार मारण्यात आले.
खरोखरच शंभू राजांच्या बलिदानाला तोड नाही. आपल्या प्रखर पराक्रमाने त्यांनी आपले नाव इतिहासात अजरामर केले. धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना मानाचा मुजरा.
तुम्हाला जर अफजल खानाच्या स्वराज्यावरील स्वारीची माहिती घ्यायची असेल तर खालील लिंकवरून तुम्ही माहिती घेऊ शकता.
.प्रतापगडाच्या पायथ्याशी विषयी माहिती 2021 | Pratapgad Makes History In Marathi
तुम्ही खालील वेबसाइटला भेट देवू शकता.
Very good sir
Thank you sir
Khupach chan