Table of Contents
आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा इतिहास |Vasudev Balwant Phadake
CREDIT – SANTOSH TAKALE1857 च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर भारतात ब्रिटीशांचे भारतावर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले होते. ब्रिटीश सरकारचा अत्याचार खूप वाढला होता. ब्रिटीश सरकारच्या या अन्यायी राजवटीला आणि आर्थिक शोषणाला सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून प्रतिकार करण्याचे धाडस या महाराष्ट्राच्या भूमीत घडले. आपल्या महाराष्ट्रातील या सशत्र क्रांतीचे नेतृत्व भारतमातेच्या ज्या थोर सुपुत्राने केले , त्यांना आपण आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके या नावाने ओळखतो. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासात आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या सशत्र क्रांतीला विशेष महत्व आहे. चला तर मित्रांनो आपण आजच्या या लेखात आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा संपूर्ण इतिहास जाणून घेऊ या.
आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा परिचय : Vasudev Balwant Phadake
आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असलेल्या शिरढोण या गावी 4 नोव्हेंबर 1845 ला झाला. फडके यांचे आजोबा अनंत रामचंद्र फडके हे लगतच्या कर्नाळा किल्याचे किल्लेदार होते. त्यामुळे साहजिकच बालपणीच त्यांच्या मनावर स्वराज्य, देशभक्ती आणि बलिदान ही मुल्ये रुजली गेली होती. 1857 चा उठावाचाही त्यांच्यावर परिणाम झाला असेलच. लहानपणीच ते कुस्ती,तलवारबाजी आणि घोडेस्वारी यामध्ये ते तरबेज झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्याला आले आणि ब्रिटीश सरकारच्या लष्कराच्या वित्त विभागात नोकरीला लागले.
सुरुवातीला वासुदेव फडके यांनी स्वदेशीचा प्रचार केला. विदेशी मालावर बहिष्कार करून ते स्वदेशीवर व्याख्याने देण्यास सुरुवात केली. स्वदेशीचा पाचार आणि प्रसार करण्याकरिता त्यांनी ‘ फडके स्वदेशी संस्था ‘काढली. स्वदेशी सोबतच शिक्षणाची नितांत गरज असल्याचे त्यांनी ओळखले होते. त्यामुळे त्यांनी ‘पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूट’ ‘भावे स्कूल’ ची स्थापना केली.
हे ही वाचा : World Red Cross Day Information In Marathi 2021 | आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस सोसायटीबद्दल माहिती
आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या सशस्त्र क्रांतीची पार्श्वभूमी / कारणे : Vasudev Balwant Phadake
कोणतीही क्रांती ही अचानक होत नसते. प्रस्थापित व्यवस्थेविरूद्धच्या असंतोषातून कोणत्याही क्रांतीचा जन्म होत असतो. आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या सशत्र क्रांतीच्या मागे हीच पार्श्वभूमी आहे. तत्कालीन ब्रिटीशसरकारचे जुलमी धोरण आणि अन्यायी राजवट हे प्रमुख कारण होते.इतर कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
-
महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ : आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा इतिहास
आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या सशत्र क्रांतीचे एक प्रमुख आणि तात्कालिक कारण म्हणजे महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ होय. 1876 – 1877 या दरम्यान महाराष्ट्रात अन्यंत भीषण असा दुष्काळ पडला होता. या भीषण दुष्काळात लाखो लोकं भुकेने तडफडून मरण पावली. जनावरांना चारा नसल्याने ती पाळीव जनावरेसुद्धा मारू लागली होती. अशा या अत्यंत भीषण परिस्थितीत जनतेला सर्व प्रकारची मदत करणे कोणत्याही सरकारचे आद्यकर्तव्य असते. परंतु अन्यायी ब्रिटीश सरकारने जनतेला कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. जनतेला अन्याधान्य पुरविणे, आर्थिक मदत करणे सोडून ब्रिटीश सरकारने सक्तीने शेतसारा वसूल करणे सुरूच ठेवला. ब्रिटीश सरकारचा हा अमानुषपणा आणि संवेदनशून्यता यामुळे आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना ब्रिटीश सरकारची प्रचंड चीड आली त्यातूनच त्यांनी सशस्त्र क्रांती केली होती.
-
लहूजी वस्ताद साळवे , न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि दादाभाई नौरोजी यांचा प्रभाव :
वासुदेव फडके क्रांतिवीर लहूजी उस्ताद साळवे यांच्या संपर्कात आल्यावर प्रभावित झाले. लहूजी वस्ताद यांच्या तालीमीतच फडके यांची ब्रिटीश सरकारच्या विरोधात लढण्याची मानसिक तयारी झाली होती. लहूजी साळवे यांनी वासुदेव फडके यांना तळागाळातील लोकांना सोबत घेऊन ब्रिटीश सरकारच्या विरोधात लढण्याचे महत्व पटवून दिले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि पितामह दादाभाई नौरोजी यांचा प्रभाव आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यावर पडला होता. आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुण्यामध्ये असलेल्या लष्कराच्या वित्त विभागात कारकून म्हणून नोकरीला होते. म्हणूनच त्यांना ब्रिटीश सरकारच्या आर्थिक धोरणांची जवळून जाणीव झाली होतीच. पितामह दादाभाई नौरोजी यांच्या प्रसिद्ध अशा Poverty And Un-British Rule In India 1867 साली लिहिलेल्या ग्रंथातील आर्थिक शोषणाचा सिद्धांताचा प्रभाव वासुदेव फडके यांच्यावर पडला होता.
त्याचसोबत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुण्यामध्ये भारताच्या आर्थिक शोषणावर आणि स्वदेशीवर व्याख्याने दिली. ब्रिटीश सरकार कशाप्रकारे भारतातील संपत्ती लुटत आहेत आणि त्याचा परिणाम भारतातील गोरगरीब जनतेवर होत आहे हे पाहून वासुदेव फडके उद्विग्न झाले. ब्रिटीश सरकारच्या विरोधात चीड निर्माण होऊन त्यातूनच त्यांनी सशत्र क्रांती केली.
-
स्वतःवर झालेला अन्याय : वासुदेव बळवंत फडके यांचा इतिहास
वर सांगितल्याप्रमाणे वासुदेव फडके हे पुण्याला लष्करी विभागात नोकरीला होते. तेव्हा ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या अन्यायी वृत्तीचा त्यांना अनुभव आला होता. जेव्हा त्यांची आई गंभीर आजारी होती तेव्हा त्यांना आईला भेटण्यासाठी रजा लवकर मिळाली नव्हती. ज्यावेळी रजा मिळताच ते गावी पोहोचले तेव्हा फार उशीर झालेला होता. त्यांच्या आईचे निधन झालेले होते. नंतर पुढे त्यांना आईच्या श्राद्धासाठीही रजा नाकारल्या गेली होती. या त्यावेळी आलेल्या अनुभवाने त्यांच्यावर खूप खोलवर परिणाम झाला आणि त्यांनी नोकरी सोडली. तेथून पुढे त्यांना स्वतःला देशासाठी समर्पित केले.
रामोशी आणि कोळी बांधवांचे संघटन : Vasudev Balwant Phadake
आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी समाजातील अठरापगड जातींचे संघटन केले. त्यांनी तळागाळातील आणि लढाऊ वृत्तीच्या लोकांना एकत्रित केले. वासुदेव फडके यांनी पुणे ,सातारा , नगर आणि कोकण या भागातील रामोशी , कोळी , मांग, भिल्ल, धनगर बांधवांचे सहकार्य घेतले. यामध्ये रामोशी समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्यामुळे या सशस्त्र क्रांतीला रामोशांचे बंड असेही म्हटल्या जाते. दौलतराव नाईक रामोशी हे या संघटनातील एक प्रमुख आणि महत्वाचे सहकारी होते. ते जणू वासुदेव फडके यांचे उजवे हात बनले होते. दौलतराव नाईक यांच्या मदतीने वासुदेव फडके यांनी रामोशी बांधवांची खूप मोठे फौज तयार केली होती.
हे ही वाचा : महाराष्ट्र पोलिस भरती 2026 अभ्यासक्रम | संपूर्ण माहिती, विषयवार तयारी आणि महत्त्वाची पुस्तके |Maharashtra Police Exam Pattern 2026
सशस्त्र क्रांतीला सुरुवात : Vasudev Balwant Phadake
ब्रिटीश सरकारच्या विरोधात लढण्यासाठी फौज उभारणे, त्यांचे वेतन करणे, शस्त्र खरेदी करणे या करिता खूप मोठी संपत्ती पाहिजे होती. म्हणून त्यांनी गावागावातील धनाढ्य आणि सावकार यांच्यावर दरोडा टाकण्यास सुरुवात केली. सशस्त्र क्रांतीची पहिली ठिणगी 23 फेब्रुवारी 1879 ला पडली. वासुदेव फडके यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत पुणे जिल्ह्यातील धामारी या गावात पहिला यशस्वी दरोडा टाकला. या दरोड्यात त्यांना 3 हजार रुपये मिळाले होते. हा दरोडा काही दरोडेखोरांसारखा लुटणे असा नव्हता. ब्रिटीशसरकारच्या विरोधात लढण्यासाठी त्यांना संपत्ती हवी होती.त्याच महिन्यात 25 ते 27 फेब्रुवारी 1879 लोणी आणि खेड या गावांवर दरोडा टाकला.
5मार्च 1879 रोजी त्यांना जेजुरीजवळ असलेल्या वाल्हे या गावावर दरोडा टाकला. पुढे लागलीच त्यांनी मल्हारगड, मंगदारी,चिखले,चांदगाव, सावरगाव,नेरेगाव,चौल अशा गावांवर दरोडा टाकून लाखो रुपये जमा केले. त्या रुपयातून त्यांच्या फौजेचा पगार आणि शस्त्र खरेदीसाठी उपयोग होत असे. वासुदेव फडके यांच्या या विद्रोहाने ब्रिटीश सरकारला हैराण करून टाकले होते. तत्कालीन वर्तमानपत्रे जसे मुंबई टाइम्स, लंडन टाइम्स, इंडियन डेली न्यूज पुना हेरॉल्ड, डेक्कन हेरॉल्ड यांनी फडके यांना दरोडखोर म्हणून प्रसिद्धी दिली होती. पुढे शिरूर आणि खेड तालुक्यातीलसरकारी खजिना लुटला होता.
आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची अटक आणि खटला : Vasudev Balwant Phadake
वासुदेव फडके यांनी आपल्या विद्रोहाने ब्रिटीश सरकारला त्रस्त करून सोडले होते. त्यांना रघुनाथ मोरेश्वर भट यांच्या मदतीने रोहील्यांचे सहकार्य मिळाले. इस्माईलखान सह 500 रोहिले त्यांना मिळाले.कसारा घाट येथे दौलतराव नाईक देखील मृत्युमुखी पडले होते. पैशांची कमी पडू लागली होती. ब्रिटीश अधिकारी मेजर हेन्री विल्यम डॅनियल यांना फडके यांच्या फौजेचा पिच्छाच पुरवला. फितुरीमुळे त्यांचे बेत ब्रिटीश सरकारच्या हाती लागले. अशातच फडके हे विजापूर जिल्ह्यातील देवर नावडगी असतांना या गावातील बुद्धविहारात झोपलेल्या अवस्थेत मेजर हेन्री विल्यम डॅनियल आणि निजामाचा पोलीस आयुक्त अब्दुल हक यांनी फडके यांना 21 जुलै 1879 ला पकडले आणि ठाण्याच्या कारागृहात ठेवले.
फडके यांच्यावर राजद्रोहाचा आरोप लावला गेला. असा आरोप असलेले वासुदेव बळवंत फडके हे पहिले भारतीय होते. फडके यांचे वकीलपत्र गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) आणि महादेव चिमणाजी आपटे यांनी घेतले होते. परंतु त्यांना यश आले नाही फाशीची शिक्षा टळून आजन्म कारावासाची शिक्षा मिळाली. शेवटी फडके यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली.
आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू :
वासुदेव बळवंत फडके यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. मात्र त्यावेळी अंदमान कारागृहाचे काम चालू होते. त्यामेले फडके यांना येमेन देशातील एडन येथील कारागृहात ठेवण्यात आले. तेथून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता मात्र ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्यांना लगेच पकडले. कारावासात त्यांन खूप त्रास देण्यात आला. या अत्याचाराला वैतागून त्यांनी अन्नत्याग केला. त्यातच त्यांना क्षयरोग होऊन 17 फेब्रुवारी 1883 ला त्यांचा मृत्यू झाला.
निष्कर्ष : Vasudev Balwant Phadake
आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (Vasudev Balwant Phadake) यांची सशस्त्र क्रांती जरी ब्रिटिश सरकारच्या विरोधात अयशस्वी झाली. तरी त्यांनी पेटवलेली क्रांतीज्योत तेवत राहिली.त्यातूनच पुढे भारतात असंख्य क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली. आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची क्रांती भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अजरामर झाली.
MPSC ची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे प्रश्न : FAQ
-
वासुदेव बळवंत फडके यांना आद्यक्रांतिकारक का म्हणतात ?
-
वासुदेव बळवंत फडके हे उठाव करण्याच्या अगोदर कोठे नोकरी करत होते ?
-
वासुदेव बळवंत फडके यांनी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोणत्या संस्था स्थापन केल्या ?
-
कोणत्या ब्रिटीश अधिकाऱ्याने वासुदेव बळवंत फडके या अटक केली ?
-
वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता ?
विद्यार्थी मित्रांनो वरील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळतील.
मित्रांनो तुम्हाला आमचा हा लेख जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.
तुम्हाला जर शेअर मार्केटविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या www.marathitrader.in या वेबसाइटला जरूर भेट ध्या.
SOURCE : GOOGLE
