मुरार बाजी देशपांडे यांचा अतुलनीय पराक्रम | पुरंदरचे युद्ध | Murar Baji Deshpande

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांनी पेटवलेल्या या स्वराज्याच्या यज्ञकुंडात असंख्य ज्ञात अज्ञात  मावळ्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन तो यज्ञकुंड तेवत ठेवला .अशा या असंख्य मावळ्यांपैकीच एक होते मुरार बाजी देशपांडे !  मुरार बाजी देशपांडे (Murar Baji Deshpande) हे १७व्या शतकातील हिंदवी स्वराज्याचे एक पराक्रमी आणि निष्ठावंत सेनानी होते.  त्यांनी  पुरंदर किल्ल्याच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानामुळे आणि   रणांगणात गाजवलेल्या शौर्यामुळे ते इतिहासात अजरामर झाले आहेत. 

Murar Baji Deshpande
मुरारबाजी देशपांडे. flicr.com

प्रारंभिक जीवन आणि जावळीचे युद्ध :

मुरार बाजी देशपांडे यांचा जन्म महाराष्ट्रातील महाड तालुक्यातील किंजळोली गावात झाला. त्यांचे मूळ गाव जावळी (सातारा जिल्हा) होते.  प्रारंभी मुरार बाजी  चंद्रराव मोरे यांच्या सेवेत होते. चंद्रराव मोरे महाराजांच्या कृपेने  जावळीच्या गादीवर बसले. मात्र पुढे चंद्रराव मोरेने महाराजांना जुमेनासे केले. त्यानंतर मात्र महाराजांनी जावळीवर हल्ला केला. त्यावेळेस मुरार बाजी चंद्रराव मोरेंच्या बाजूने लढत होते. मुरार बाजी त्वेषाने लढत होते.  मुरार बाजींचा पराक्रम पाहून महाराज खुश झाले.  जावळी जिंकल्यावर महाराजांनी मुरार बाजींना समजावले, स्वराज्याची महती सांगितली. मग  महाराजांनी स्वराज्याच्या सेवेसाठी मुरार बाजींना सामील करून घेतले. ही घटना दि. १५ जानेवारी १६५६ सालची आहे.

हे ही वाचा :  प्रतापगडचे युद्ध  

स्वराज्यावर मिर्झाराजा जयसिंगचे आक्रमण आणि पुरंदरचे युद्ध :  Murar Baji Deshpande| Purandarche yudhh  

   छत्रपती शिवाजी महाराजांनी चेतवलेल्या महाराष्ट्रातील क्रांतीमुळे औरंगजेब चिडला होता. मराठ्यांचे स्वतःचे राज्य ही कल्पनाच सहन होत नव्हती. त्यामुळेच त्याने आपला मामा शाहिस्तेखान यास स्वराज्यावर पाठविले. परंतु महाराजांनी लाल महालावर अचानक छापा टाकून त्याची तीन बोटे तोडली.

काही कालावधीनंतर महाराजांनी सुरतेवर हल्ला करून तेथून अगणित द्रव्य आणले. सुरत ही मुघल साम्राज्याची आर्थिक राजधानी होती. सुरतेवर हल्ला करून महाराजांनी जणू मुघल साम्राज्याचे नाकच कापले.  महाराजांनी बरोबर औरंगजेबाच्या वर्मावर घाव घातला.

आता औरंगजेब पक्का चिडला . महाराजांना हरवणारा योद्धा त्याला पाहिजे होता. त्याच्या सुरुवातीच्या काळात सत्ता काबीज करतांना त्याला मदत करणाऱ्या पराक्रमी मिर्झा राजे जयसिंगची त्याला आठवण झाली.  

मिर्झा राजा जयसिंगसोबत दिलेरखान , दाउदखान कुरेशी, कुबाद खान, किरतसिंग कछवाह, पुरनमल बुदेला अशी असंख्य पराक्रमी सरदार आणि सोबत अगणित दारुगोळा औरंगजेबाने दिला. एकूण ८० हजारावर फौज घेऊन मिर्झाराजा जयसिंगाने स्वराज्यावर आक्रमण केले. १६६५ साली मुघल सम्राट औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंह आणि दिलेरखान यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्यावर मुघल फौज सोडली.

मुरार बाजी देशपांडे यांचा प्रखर पराक्रम :

 दिलेरखान याने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. रोज तोफेचे गोळे पुरंदर आणि (रुद्रमाळ ) या किल्ल्यांवर पडत होते. मराठे मोठ्या पराक्रमाने मुघलांच्या हल्ल्याला तोंड देत होते. पुरंदर किल्ला जिंकून घेणे अत्यंत कठीण होता परंतु त्याचे रक्षण करणे हे त्यापेक्षाही कठीण होते. कारण वज्रगड हा किल्ला पुरंदर किल्ल्यापेक्षा कमी उंच होता. दोन्ही किल्ले एकाच मोठ्या डोंगरावर होते. उंचीने कमी असलेला वज्रगड जर शत्रूच्या हाती गेला तर पुरंदर किल्ला जिंकणे सोपे होते. हीच बाब दिलेरखानाने हेरली. त्याने वज्रगडावर हल्ले प्रखर केले. त्यावेळी वज्रगडावर सुमारे ३०० मावळे होते.  मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली परंतु शेवटी वज्रगड (रुद्रमाळ) किल्ला मुघलांनी जिंकला.

आता दिलेरखान पूर्ण ताकदीनिशी पुरंदरावर हल्ला करू लागला. एकामागून एक प्रखर हल्ले दिलेरखान पुरंदरावर करीत होता.  परंतु मुरार बाजी आणि त्यांचे मावळे मुघलांचे प्रत्येक हल्ले परतावून लावत होते. शेवटी दिलेरखान याने पुरंदरावर सुलतानढवा केला. त्याने निवडक असे ५ हजार निवडक  पठाण आणि बहलिया जातीचे शूर हशम पुरंदरावर सोडले. स्वतः मात्र तो पिछाडीवरच राहला. इकडे  मुरार बाजी देशपांडे यांनी देखील अत्यंत शूर असे  ७०० मावळे निवडले. खालून येणाऱ्या  पठाणांच्या फौजेवर सातशे एक मावळे तुटून पडले. मुरार बाजी आणि त्यांच्या मावळ्यांच्या प्रखर आवेशापुढे पठाण तग धरू शकले नाहीत पठाणांची धडाधड मुंडकी उडत होती. पुरंदरच्या बालेकिल्ल्यावरील ही लढाई दिलेरखान खाली पायथ्याशी राहूनच बघत होता. मुरार बाजी आपल्या मावळ्यांसह त्वेषाने लढत होते. त्यांच्या या पराक्रमामुळे मुघल फौज पळत सुटली. मुरार बाजींनी त्या पळणाऱ्या मुघलांच्या मागे जात सरळ पायथ्याशी असलेल्या दिलेरखानाच्या छावणीवर हल्ला चढविला. असंख्य शत्रूच्या मधात मुरार बाजी आणि इतरमावळे बेडरपणे लढत होते. मुरार बाजींनी तर पराक्रमाची शर्थ केली.  

दिलेरखान मुरार बाजींच्या अद्वितीय शौर्याने अचंबित झाला. शिवाजी महाराजांची माणसे जर अशी पराक्रमी असतील तर दस्तुरखुद्द महाराज कसे असतील ? दिलेरखान पुरता भयचकित झाला. असा जबरदस्त योद्धा खानाने नक्कीच या अगोदर बघितला नसेल. तो आतापर्यंत मावळ्यांवर बाण सोडीत होता. पण तो थांबला. मुरार बाजींचे तो पराक्रम पाहून त्याने मुरार बाजीलाही थांबवले आणि म्हणाला ,” अय बहादूर, तुम्हारी बहादुरी देखकर मै बहोत खूष हुवा हु,तुम हमारे साथ चलो, हम तुम्हारी  शान रखेंगे.” भर रणांगणात खानाने मुरार बाजींना आमिष दाखवले. पण मुरार बाजींनी स्वाभिमानाने आणि भयंकर त्वेषाने  दिलेरखानास असे उत्तर दिले कि , “आम्ही महाराजांची माणसं तुझा कौल घेतो कि काय ?” आणि पुरंदरचा हा कालभैरव सरळ दिलेरखानाच्या दिशेने हल्ला चढवत धावत सुटला. पण तेवढ्यातच दिलेरखानाने बाण मारला आणि त्यात मुरार बाजी देशपांडे यांना वीरमरण आले. दिलेरखान याला याच ठिकाणी स्वराज्यातील मावळे किती पराक्रमी आहेत याची जाणीव झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहाडी चुहा असा दिल्लीत बसून औरंगजेब उल्लेख करत होता. मात्र शिवरायांचा एकएक किल्ला जिंकणे किती अवघड आहे याची जाणीव दिलेरखानास झाली.

मुरार बाजी देशपांडे यांच्या प्रखर पराक्रमाने दिलेरखान सारखा योद्धाही प्रभावित झाला होता. मुरार बाजी देशपांडे यांच्या मृत्यूनंतर ही मराठे अधिक प्रखरपणे लढू लागले. पुरंदरच्या तह होईपर्यंत हे पुरंदरचे युद्ध सुरूच होते.  शेवटपर्यंत मराठ्यांनी दिलेरखान यास पुरंदर किल्ला जिंकु दिला नाही.

पुरंदरचे हे युध्द सुमारे १६ मे १६६५ रोजी  झाले होते. मुरार बाजी आणि इतर मावळे यांच्या धगधगत्या पराक्रमापुढे दिलेरखान आणि त्याची पठाणी फौज निस्तेज झाली होती.मुरार बाजींसारखा पराक्रमी योद्धा दिलेरखानाने पूर्वी बघितला नव्हताच. या पुरंदरच्या युद्धामुळे दिलेरखानास मावळ्यांची खरी ओळख झाली असेल.

पुढे १३ जून १६६५ ला पुरंदरचा तह झाली आणि हे पुरंदरचे युद्ध संपले. शेवटी दिलेरखानास हा किल्ला जिंकता आलाच नाही.

सांस्कृतिक प्रभाव : Murar Baji Deshpande | Purandarche yudhh  

शाहिरांनी मुरार बाजी यांना मानाचे स्थान दिले. मुरार बाजी यांच्या पराक्रमावर पोवाडे रचले गेले. मुरार बाजी देशपांडे यांच्या जीवनावर आधारित “वीर मुरार बाजी” हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या शौर्याची गाथा आजही महाराष्ट्रातील लोककथांमध्ये सांगितली जाते.

मुरारबाजी देशपांडे यांचे जीवन हे निष्ठा, शौर्य आणि स्वराज्याच्या आदर्शांचे प्रतीक आहे. त्यांचे बलिदान आजही प्रेरणादायक आहे.

मित्रांनो तुम्हाला आमचा Murar Baji Deshpande हा लेख आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा.

मित्रांनो तुम्हाला जर शेअर मार्केटविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या http://marathitrader.in या वेबसाईटला जरूर भेट द्या.

Spread the love

Leave a Comment